देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विविध विभागांतील कामांसाठी नेमलेल्या ठेकेदारांचे करार तसेच बोर्डाच्या हद्दीत सुरु असणाऱ्या सर्व विकासकामांचे कामांचे तसेच विविध वार्षिक ठेक्यांचे आदेश सामान्य जनतेच्या माहितीसाठी तसेच पारदर्शक कारभारासाठी सूचना फलकावर व संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
कॅन्टोनमेंट बोर्डाच्या हद्दीतील सातही वॉर्डांतील नागरिक विविध करांच्या रूपाने मोठ्या प्रमाणात निधी जमा करीत आहेत. दरमहा अगर दोन महिन्यांनी होणाºया सर्वसाधारण सभेत लाखो रुपयांच्या कामांना मंजुरी दिली जाते . मात्र कामे कधी सुरु होतात व कधी पूर्ण होतात याचा थांगपत्ता लागत नाही, अशी नागरिकांची ओरड आहे. बोर्डाकडून विविध विभागांच्या मार्फत विविध विकासकामे, दुरुस्ती व देखभाल, देण्यात आलेले विविध ठेके, त्यांची माहिती, ठेकेदारांना देण्यात आलेले कामांचे आदेश, त्यांच्याशी करण्यात आलेले करार, कामाची रक्कम, कामाची मुदत, संबंधितांची जबाबदारी आदी बाबींची सविस्तर माहिती नागरिकांना समजत नाही. त्यामुळे कामाचे आदेश प्रसिद्ध केल्यास कोणत्या वॉर्डात काय काम सुरू झाले आहे, याची सविस्तर माहिती मिळाल्यास त्यावर दर्जेदार काम होण्यासाठी अंकुश ठेवणे जागरूक नागरिकांना शक्य होऊ शकते. तसेच मोठ्या रकमेच्या कामांच्या ठिकाणी कामाबाबतची संपूर्ण माहिती असलेला फलक लावणे बंधनकारक करावे, असे मत काही जागरूक नागरिकांनी व्यक्त केले आहे.
राज्य सरकारकडून अतिरिक्त शिक्षक वगळून इतर शिक्षकांच्या वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम मिळत आहे. बोर्डाच्या उत्पन्नात मिळकतकर, वाहन प्रवेश शुल्क यांचा मोठा वाटा आहे. त्यावर बोर्डाचा आर्थिक गाडा हाकला जात आहे. बोर्डात जमा झालेला पैसा कोणत्या कामांसाठी व किती खर्च केला जातो हे करदात्यांना समजायला हवे, त्याकरिता बोर्ड प्रशासनाने कामाचे आदेश तातडीने प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.