पिंपरी : पुणे, मुंबईसारख्या औद्योगिक तसेच सांस्कृतिक शहरांच्या मध्यवर्ती वसलेल्या मावळ तालुक्यामध्ये विपुल निसर्गसंपदेमुळे उद्योग-व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढत असून, तालुक्यात राजकीय अस्तित्व, जमिनींना आलेले सोन्याचे भाव त्यामुळे गगनाला भिडलेले खरेदी-विक्रीचे व्यवहार, उद्योगातील मक्तेदारी, यामुळे मावळ तालुक्यात गेल्या काही वर्षांमध्ये विविध क्षेत्रांतील वर्चस्ववादातून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर फोफावली आहे. स्वतःची ओळख असून, स्वतःची वचक, दहशत निर्माण होण्यासाठी दिवसाढवळ्या भर बाजारात गर्दीच्या ठिकाणी निर्घृण हत्या करण्याचा मावळ पॅटर्न उदयाला येत आहे.
सुसंस्कृत मावळमध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये स्पर्धात्मक वातावरणामध्ये प्रगती करताना नैतिकतेने स्पर्धा केली जात होती. परंतु, अलीकडच्या काळामध्ये साम-दाम-दंड-भेद याचा वापर करत एखाद्याला थेट मारून टाकण्यापर्यंत विघातक प्रवृत्ती वाढल्या असून, आगामी काळामध्ये अशा स्वरूपाच्या कारवायांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे.
मावळ तालुक्यामध्ये मागील दहा ते पंधरा वर्षांच्या काळात सामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सचिन शेळके, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष बंटी वाळुंज, लोणावळ्याचे माजी नगराध्यक्ष भूपेंद्र चौधरी, शिरगावचे लोकनियुक्त सरपंच प्रवीण गोपाळे यांची गजबजलेल्या ठिकाणी अमानुषपणे हत्या झाली आहे. विशेष म्हणजे यामधील सर्वच हत्या या भर दिवसा घडल्या आहेत. त्याशिवाय कोयत्याने वार करणे, गोळीबार करून हत्या करणे हा पॅटर्न सारखाच वाटतो.
यापैकी सामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येची चौकशी सीबीआयमार्फत होऊनदेखील अद्यापही आरोपींचा शोध लागलेला नाही. अशा प्रकारच्या घटनांमुळे मावळात दहशत पसरली असून, एखाद्याला अमानुषपणे मारून टाकण्यापर्यंत विघातक प्रवृत्ती वाढल्या आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये अशा स्वरूपाच्या कारवायांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे.