पिंपरी-चिंचवड: मागील काही दिवसांपुर्वी चिंचवडमध्ये चेन्नईतील एका व्यक्तीला महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली होती. यानंतर आता पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या (Pimpri-Chinchwad police) तपासात अजून एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. अटक केलेल्या व्यक्तीने आतापर्यंत शंभरहून अधिक महिलांशी मॅट्रिमोनिअल वेबसाईटवरून (matrimonial websites) संपर्क करून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
संशयित चेन्नईचा रहिवासी-
गेल्या आठवड्यात चेन्नईचा रहिवासी असणारा संशयित प्रेमराज थेवराजला (Premraj Thevraj) एका महिलेला तिच्यासोबत बनावट विवाह करून 11 लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या वर्षीच्या एप्रिलमध्ये तो एका मॅट्रिमोनिअल वेबसाईटवर महिलेला भेटला होता, असे पोलिसांनी सांगितले.
आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांची कसरत-
थेवराजला अटक करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली होती. यासाठी तक्रारदाराने थेवराजला पुण्यात येण्यास सांगितले होते आणि नंतर पोलिसांना सापळा रचून त्याला अटक केली होती. अटक केल्यानंतर संशयित आरोपीकडून सात मोबाईल, 13 सिम कार्ड, दोन आधार कार्ड, दोन पॅन कार्ड आणि दोन ड्रायव्हिंग लायसन्स जप्त केले होते.