पिंपरी : नामांकित ई-काॅमर्स कंपनीत मॅनेजर असलेल्या उच्चशिक्षित महिलेवर एका ‘जीप’मध्ये बलात्कार झाला. यातील आरोपीने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून आठ लाख रुपये घेतले. ते परत न करता पीडित महिलेची फसवणूक केली. तसेच लैंगिक अत्याचार केले. रहाटणी आणि वाकड येथे २३ जुलै ते ७ ऑक्टोबर २०२१ या कालाधीत हा प्रकार घडला.
पीडित ३० वर्षीय महिलेने याप्रकरणी शुक्रवारी (दि. २१) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आश्विक शुक्ला (रा. बालेवाडी, पुणे) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित महिला उच्चशिक्षित असून नामांकित ई-काॅमर्स कंपनीत मॅनेजर आहे. जीवनसाथी डाॅट काॅम या वेबसाईटवरून फिर्यादीची आणि आरोपीची ओळख झाली. सेन्ट्रल मिनिस्ट्री ऑफ ॲग्रीकल्चर ॲण्ड फार्मर वेल्फेअर येथे डायरेक्टर म्हणून नोकरीला आहे, असे सांगून आरोपीने सांगितले. तसेच लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
माझ्याकडे एक बिझनेस प्लॅन आहे. कस्टममधून आलेल्या वस्तू कमी किमतीत घेऊन त्यांची विक्री करण्याचा व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यासाठी ४० लाख रुपयांची आवश्यकता असून सध्या ३० लाख रुपये आहेत. व्यवसायासाठी आणखी १० लाख रुपयांची आवश्यकता आहे, असे आरोपीने फिर्यादीला सांगितले. तसेच १० लाख रुपयांची फिर्यादी महिलेकडे मागणी केली. त्यानुसार फिर्यादी महिलेने आरोपीला आठ लाख रुपये दिले.
दरम्यान, आरोपीने रहाटणी तसेच वाकड येथे फिर्यादी महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. वाकड येथील एका हाॅटेलच्या पाठीमागे एका जीपमध्ये देखील अत्याचार केले. पीडित फिर्यादी महिलेने आरोपीला दिलेले आठ लाख रुपये परत मागितले असता आरोपीने पैसे परत न करता फिर्यादी महिलेची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.