पुणे : लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मावळमध्ये मतदान होणार आहे. मावळात महायुतीकडून खासदार श्रीरंग बारणे, महाविकास आघाडीकडून माजी महापौर संजोग वाघेरे आणि वंचितच्या माधवी जोशी यांची प्रमुख तिरंगी लढत होणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी ३८ उमेदवारांनी ५० अर्ज दाखल केले आहेत. अशातच एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. मावळमधून चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाईफेक करणारा मनोज गरबडे निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरला आहे. त्याने अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यात १८ एप्रिलपासून सुरुवात झाली. महायुतीकडून श्रीरंग बारणे, महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे, ‘वंचित’कडून माधवी जोशी यांच्यासह १८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, अखेरच्या दिवशी गुरुवारी सर्वाधिक २० उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामध्ये पंकज ओझरकर, मनोज गरबडे, उमाकांत मिश्रा, लक्ष्मण अढाळगे, इकबाल नावडेकर, संजय वाघेरे, अजय लोंढे, गोविंद हेरोडे, राजू पाटील, दादाराव कांबळे, चिमाजी शिंदे, राजेंद्र काटे, राजाराम पाटील, हजरत पटेल, राजेंद्र छाजछिडक, मारुती कांबळे, संजोग पाटील, रफिक सय्यद, भाऊ आडागळे, विजय ठाकूर यांचा समावेश आहे. एकूण ३८ उमेदवारांनी ५० अर्ज दाखल केले आहेत.
दरम्यान मावळमधून तिरंगी लढत होणार असल्याची चर्चा आहे. पण अपक्ष उमेदवार म्हणून मनोज गरबडे यांचे नाव चर्चेत आले आहे. चिंचवडमधील मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी चंद्रकांत पाटील आले होते. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर गरबडे याने शाई फेकली होती. या प्रकरणी मनोजसह तिघांना पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणानंतर राज्यभर वातावरण ढवळून निघाले होते. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्यावरून तिघांवरील गुन्हे मागे घेऊन जामीन देण्यात आला होता.
लोकसभेच्या रणधुमाळीत मनोज गरबडेने मावळ मधून अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. तो समता सैनिक दलाचा कार्यकर्ता आणि कट्टर आंबेडकरवादी आहे. मावळ मतदारसंघातून ३८ उमेदवारांनी ५० अर्ज दाखल केले. त्यात महायुतीच्या वतीने श्रीरंग बारणे विरुद्ध महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांची प्रमुख लढत होणार असून वंचितच्या माधवी जोशींनी अर्ज दाखल केल्यानंतर ती लढत तिरंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.