लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी (जि. पुणे) : वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्या थर्मोव्हेरिटा कंपनीच्या तळवडेतील मालमत्तेचा लिलाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित कंपनीने २ लाख ७२ हजारांचा मालमत्ताकर अद्यापही भरलेला नाही. जप्तीची कारवाई केलेल्या कंपनीचा लिलाव होऊ शकतो, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाचे प्रमुख नीलेश देशमुख यांनी शनिवारी दिली.
पूजा खेडकर वेगवेगळ्या वादग्रस्त प्रकरणांमुळे अडचणीत आल्या आहेत. त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील थर्मोव्हेरिटा कंपनीचा पत्ता देऊन वायसीएम रुग्णालयातून सात टक्के दिव्यांग प्रमाणपत्र मिळवले आहे. दिव्यांग प्रमाणपत्रासाठी रेशन कार्ड ओळखपत्र म्हणून दिले होते. या रेशन कार्डवर याच कंपनीचा पत्ता आहे. ही कंपनी बंद पडली असून, केवळ इमारत उभी आहे.
महापालिकेचा कर थकविल्याप्रकरणी या कंपनीला जप्तीची नोटीस आधीच देण्यात आली असून आता लिलाव होण्याची शक्यता आहे. एप्रिल २०२२ पर्यंत संबंधित कंपनीने नियमित कर भरला आहे. परंतु त्यानंतर दोन वर्षांचा २ लाख ७२ हजार कर थकीत आहे. याबाबत मार्च महिन्यात जप्तीपूर्व नोटीस दिली आहे. सध्या अधिपत्र बजाविण्यात आले असून त्यांची मालमत्ता जप्त केली आहे.