पुणे: जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि सर्वाधिक सातबारा उतारे असणा-या हवेली तालुक्याची दस्त नोंदणी केवळ आॅनलाईन पध्दतीने करण्याचा सूचना जमाबंदी आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यापुढील काळात खरेदी विक्री व्यवहारात पारदर्शकता येणार आहे. तसेच सातबारा उता-यावर फेरफार करून घेण्यासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयाच्या फे-या माराव्या लागणार नाहीत.
राज्याच्या महसूल विभागाच्या यंत्रणेकडून गेल्या काही वर्षांपासून ई-फेरफार प्रक्रियेंतर्गत आॅनलाईन सातबारा उतारे तयार करण्याचे काम सुरू आहे.नागरिकांना संगणकिकृत साईन सातबारा उतारे दिले जात आहेत.पुणे जिल्ह्यातील हवेली तालुका वगळता सर्व तालुक्यांचे उतारे आॅनलाईन पध्दतीने दिली जात होते. तसेच जिल्ह्यातील नागरिकांनाही हवेली वगळता सर्व सातबारा उतारे आॅनलाईन पद्धतीने पहाता येत होते.परंतु,हवेली तालुक्याचा पसारा मोठा असल्याने या तालुक्यातील सातबारा उता-याचे डिजिटायजेशनचे काम करण्यास अडचणी येत होत्या.परिणामी हवेली तालुक्यातील खरेदी विक्री व्यवहार दुय्यम निबंधक कार्यालयाकडून ‘स्किप पर्याय’ निवडून आॅफलाईन पद्धतीने दिले जात होते. त्यामुळे खरेदी विक्रीचे व्यवहार करणा-या व्यक्तींना महसूली यंत्रणेकडे जावून फेरफारची कामे करून घ्यावी लागत होती.परंतु,आता हवेली तालुकाचे सातबारा उतारेही आॅनलाईन पध्दतीने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्ह्यात नागरिकरण वाढत असल्याने मोठ्या प्रमाणावर जमीनीचे खरेदी विक्री व्यवहार झाले.परिणामी एकट्या हवेली तालुक्यात २ लाख ६ हजार ५१३ सातबारा उतारे आहेत. त्यामुळे कात्रज भागातील काही गावांमध्ये एकाच सातबारा उता-यात सुमारे ८00 ते ९00 खातेदारांची नावे आहेत. कात्रज परिसरातील पाच गावांमध्येच १९ हजार सातबारा उतारे आहेत.पूर्वी जमिनीच्या काही नोंदी हेक्टर,आरचौरस मिटर आणि चौरस फुट या एककात होत्या. त्याचे सध्याच्या गुठेवारीत रुपांतर करण्यास वेळ लागला.हवेली तालुक्याचा व्याप मोठा असल्यामुळे सातबारा डिजिटायजेशनच्या कामात अडचणी येत होत्या. वेगळ्या सर्व्हरवर त्यासंदर्भातील काम सुरू होते. परंतु,दस्त नोंदणी आॅनलाईन पध्दतीने करण्यासाठी आवश्यक असलेले काम पूर्ण झाले आहे.दस्त नोंदणी झाल्यावर संबंधित डेटा महसूल विभागाकडे प्राप्त होईल.तलाठी कार्यालयास कोणतीही सबब सांगता येणार नाही.परिणामी खरेदी विक्री व्यवहारात पारदर्शकता येईल.आता महसूल विभागाचे काम वाढणार आहे. - विजयसिंह देशमुख, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारीपुणे जिल्ह्यातील हवेली हा मोठा व महत्वाचा आणि कामकाजासाठी किचकट तालुका होता. परंतु, मागील काही महिन्यांपासून हवेली प्रांताधिकारी कार्यालयात ठेवण्यात आलेल्या सर्व्हर वरून ७/१२ व ८ अ अचूक करण्यासाठी ‘एडीट’ व ‘रीएडीट’ चे काम सुरु होते. आता सर्व काम पूर्ण झाले आहे. तसेच सर्व गावांचे घोषणापत्र १,२,३ पूर्ण करून तहसीलदार हवेली यांनी आॅनलाईन प्रसिध्दीसंदर्भातील आदेश प्रसिध्द केला. त्यानुसार हवेली तालुका आॅनलाईन करून डेटाबेस सुधारणा फेज १ चे काम पूर्ण केले. तसेच हवेली तालुका तलाठी मंडळ अधिकारी व दुय्यम निबंधक यांना आॅनलाईन कामकाजासाठी उपलब्ध करून दिले. त्यामुळे हवेली तालुक्यातील खातेदारांना महाभूलेख संकेत स्थळावरून अद्ययावत ७/१२ व ८ अ उपलब्ध होणार आहेत. परंतु,सातबारा उता-यात काही त्रुटी असल्यास खातेदारांना तलाठी कार्यालयाकडे अर्ज करून कलम १५५ अंतर्गत त्यात दुरुस्ती करता येणार आहे.