पिंपरी: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पायी पालखी सोहळा (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) प्रस्थान दिनांक २९ जूनला होणार आहे. सोहळा आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, आळंदीतील पुन्हा इंद्रायणी (Indrayani River) फेसाळली आहे. त्याकडे पीएमआरडीए आणि चाकण एमआयडी, महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वारकऱ्यामधून नाराजी व्यक्त होत आहे.
'इंद्रायणी स्नान करिती प्रदक्षिणा | तुटती यातना सकळ त्यांच्या ||' असे इंद्रायणी मातेचे प्राचीन काळापासून असे महत्व आहे. इंद्रायणीनदीच्या काठावर श्री क्षेत्र आळंदी, देहु, तुळापुर असे प्रमुख तीर्थक्षेत्रे आहेत. या प्रमुख तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दरवर्षी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी सोहळा आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आषाढीवारी सोहळा होत असतो. यानिमित्ताने लाखो वारकरी या तीर्थक्षेत्रामध्ये येत असतात. इंद्रायणी स्नान, नगरप्रदक्षिणा, माऊलींचे दर्शन असा वारकऱ्यांचा अलिखित नियम आहे. गेल्या वर्षभरात इंद्रायणी नदी अनेकदा फेसाळली आहे. आज सकाळी पुन्हा फेस आला त्यामुळे वारकरी आणि ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नदीप्रदूषणाची कारणे आणि उपाय
१) पावसाळ्यात पावसाचे पाणी अनेक ठिकाणी थेट सांडपाणी वाहू नलिकांमध्ये जात नसल्याने रस्त्यावर साचून वाहते. यामुळे आळंदीतील रस्त्यांचे दुतर्फा असलेली नाली, ड्रेनेज होल तात्काळ देखभाल दुरुस्त करावी. वडगाव रस्ता, आळंदी मरकळ रस्ता, भागीरथी नाला आणि आळंदीतील सर्व पुलांवरील पाणी नदीत जाते. २) आळंदीतील पोस्ट ऑफिस समोरील रस्ता भोई समाज धर्मशाळा समोरील पूल परिसरात तसेच भागीरथी नाल्यावर गवत वाढले आहे. मारुती मंदिर ते इंद्रायणी नदी घाट, शनी मारुती मंदिरपर्यंत रस्त्याची देखभाल दुरुस्ती आणि स्वच्छता करण्यात यावी. जोग महाराज मार्ग स्वच्छता करून भागीरथी नाल्याचे जवळील विद्युत डी.पी. परिसरात सुरक्षा उपाययोजना करण्यात यावी.३) इंद्रायणी नदीत आळंदी नगरपरिषदेच्या हद्दीत ठिकठिकाणी थेट सांडपाणी कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता पाणी सोडले जाते. उत्तर आणि दक्षिण तटावरून सांडपाणी थेट नदीत सोडले जात आहे. यात स्वामी महाराज घाट, देविदास धर्मशाळा, कुबेरगंगा ओढा, केळगाव येथून थेट सिद्धबेट मध्ये सांडपाणी येत आहे. भगीरथ नाला येथून येणारे सांडपाणी आता थेट भक्त पुंडलिक मंदिरा समोरील नव्याने विकसित होत असलेल्या स्काय वॉक उत्तर तट येथे येत आहे. चैतन्य आश्रम तसेच बिडकर वाडा समोरून येणारे सांडपाणी थेट इंद्रायणी नदीत येत आहे. ४) आळंदीतील एकमेव उघडा असलेला मनकर्णिका नाला कायम स्वरूपी बंधिस्त करावी. मोशी आणि चाकणच्या बाजूने येणारे सांडपाणी थांबवायला हवे.
गेली अनेक वर्षांपासून इंद्रायणी नदीचं प्रदूषण झालेल आहे आणि आता पाच दिवसांवर आषाढी वारीचा सोहळा आलेला आहे.तरीसुद्धा आज नदीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलयुक्त पाण्याचा फेस आलेला आहे. लाखो वारकरी आल्यानंतर त्यांना इंद्रायणीचे स्नान होणार तर नाहीच परिणामी या केमिकलयुक्त पाण्यामध्ये जर स्नान केले तर वारकऱ्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे प्रशासनाने या गोष्टीकडे तातडीने लक्ष घालून केमिकल सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी. नदीचे होणारे प्रदुषण थांबवावे. अन्यथा प्रस्थान सोहळ्यापूर्वी याच केमिकलयुक्त पाण्यामधे उभे राहुन मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल. -विचारसगर महाराज लाहूडकर, आळंदी.
नदी जलप्रदूषणाचे पाप आळंदीकर यांच्या माथी मारले आहे. पीएमआरडीए आणि चाकण एमआयडी, महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे इंद्रायणी नदी प्रदूषणाकडे दुर्लक्ष होत आहे. इंद्रायणी नदी प्रदूषण करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे. -अर्जुन मेदनकर, कार्याध्यक्ष आळंदी जनहित फाऊंडेशन