पिंपरी : मराठा समाजास आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. पिंपरीतही आंदोलन सुरु आहे. मराठा आंदोलनाविषयी आमदार आणि खासदार यांना भूमिका जाहीर करण्याविषयी अल्टिमेटम दिला आहे. चोवीस तासांचा अवधी दिला आहे.
मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रभर आंदोलने सुरु आहेत. पिंपरी- चिंचवड शहरात अनेक ठिकाणी मराठा समाज साखळी उपोषणासह विविध भागात आंदोलन सुरु आहे. मात्र, याबाबत शहरातील चार आमदार महेश लांडगे, अण्णा बनसोडे, अश्विनीताई जगताप व उमाताई खापरे तसेच खासदार श्रीरंग बारणे यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही. या विषयी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मराठा समाजातील कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी सतिश काळे, प्रकाश जाधव, मारूती भापकर, धनाजी येळकर पाटील, नकुल भोईर, वैभव जाधव, मीरा कदम, सुनिता शिंदे, कल्पना गिडडे, नानासाहेब वारे आदी उपस्थित होते.सतिश काळे म्हणाले, स्थानिक आमदार, खासदार यांच्याविषयी प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. येत्या २४ तासात आमदार,खासदार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. असे न केल्यास झोपेत असलेल्या आमदार,खासदार यांना जागे करण्यासाठी लवकरच शहरातील मराठा समाज तुमच्या भेटीला येईल, असा इशारा बैठकीत दिला आहे.