पिंपरी : मराठा प्रतिष्ठानच्या सभासदांनी नुकतेच रत्नागिरी येथील तीन गड सर केले. संस्थेचे आठ सदस्य व एका नऊ वर्षांच्या चिमुकल्यासोबत त्यांनी रसाळगड, सुमारगड व माहिपतगड सर करण्याची मोहीम फत्ते केली. दुर्गम भागातील ग्रामस्थांना या वेळी फराळ देऊन संवाद साधला.
ट्रेकर रूपेश टेमगिरे यांनी गडांची माहिती मिळवत मोहिमेसाठी सहकार्य केले. दर्श गुंजाळ, संदीप वाघमारे, प्रेमानंद गुंजाळ, दीपक जगताप, योगेश पोतदार, पंकज बनकर, जीवन भागित, शिवाजी भोसकर यांनी ही खडतर मोहीम यशस्वी पार पाडली.लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर रात्री अकरा वाजता भोसरी चौक येथील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. रसाळवाडी येथे पोहोचताच न्याहारी उरकून गड चढण्यास सुरुवात करण्यात आली. पोलादपूर सोडून खेडवरून चिपळूणकडे जाताना रसाळगड, सुमारगड, माहिपतगड हे तीन दुर्ग आपले लक्ष वेधून घेतात. हे सर्व किल्ले जावळीच्या खोऱ्यातच येतात. रसाळगड किल्ला १७७० फूट उंचीचा आहे. रसाळगडाचा घेरा लहानच असल्याने संपूर्ण गडफेरीस एक ते दीड तास पुरतो. मोहिमेचे नेतृत्व योगेश पोतदार यांनी केले़ प्रेमानंद गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ सभासद सहभागी झाले होते.पुढे वाटाड्या घेऊन सुमारगडाकडे मार्गक्रमण सुरू करण्यात आले. सुमारगड किल्ल्यावर पोहोचल्यावर समोरच पाण्याच्या दोन टाकी आहेत. गडमाथा फारच लहान असल्यामुळे गडफेरीस अर्धा तास पुरतो. तेथेच थोडी विश्रांती घेऊन फराळ उरकण्यात आला. त्यानंतर पुढे बेलदारवाडीचा मार्गाने माहीपतगडाची वाट धरण्यात आली. दोन तासांच्या अवघड रस्त्यांनी ट्रेकर बेलदारवाडीत पोहोचले. तिथे मुक्काम करून सकाळी सात वाजता माहीपतगडाचा मार्ग धरला. अवघ्या तासाभरात ट्रेकर माहीपतगडावर पोहोचले. माहिपतगड हा सर्वांत उंच आणि विस्ताराने प्रचंड आहे. किल्ल्याचे क्षेत्रफळ १२० एकर आहे. हा गड फिरण्यास दोन ते तीन तासाचा वेळ लागतो. दुसºयादिवशी सकाळी बेलदारवडीतून जैतापूरमध्ये येऊन मोहिमेची सांगता करण्यात आली.