चाकण : चाकण हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करण्यास सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या चाकण बंद दरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत विविध ठिकाणांहून 20 जणांना ताब्यात घेतले आहे. सोमवार (30 जुलै)च्या घटनेत वाहनांची तोडफोड व जाळपोळ करणाऱ्या १०० हून अधिक तरुणांची ओळख सीसीटीव्ही फुटेजवरून पटली असून, सर्वांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत. लवकरच त्यांना अटक करून नावे जाहीर करण्यात येतील, अशी माहिती पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
पोलीस अधीक्षक पाटील यांनी जिल्ह्याची सूत्रे हातात घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी ही घटना घडली असून, परवापासून ते येथे ठाण मांडून आहेत. जुन्नर तालुक्याला मराठा मोर्चासाठी पोलीस बंदोबस्त पाठवून ते स्वत: वायरलेस यंत्रणेवर बसून संपूर्ण जिल्ह्यावर नियंत्रण ठेवत होते.
तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांची संयुक्त समिती करून अजूनही पंचनामे सुरू आहेत. अजूनही गाड्या तोडफोडीच्या तसेच सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्याच्या तक्रारी येत आहेत. त्या घेऊन पोलीस पथक पंचनामा करीत आहे. चाकणमधील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाली आली असून, जनजीवन सुरळीत झाले आहे. परिसरातील शाळा-महाविद्यालये व औद्योगिक कंपन्या सुरळीतपणे चालू झाल्या आहेत. महामार्गावर तसेच सर्व चौकांत आणि मोक्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनेत नुकसान झालेल्या लोकांना पंचनामा व इतर कागदपत्रे देण्याचे काम सुरू असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
जखमींना गृह राज्यमंत्री भेटले
बुधवारी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी जखमी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांना चाकण येथील डॉ. गोकुळे हॉस्पिटलमध्ये भेटून प्रकृतीची चौकशी केली.
दरम्यान, पोलीस पथकाने पोलीस अधीक्षक संदीप पाटील व अतिरिक्त अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण शहरातून रूट मार्च काढण्यात आला. या रूटमार्चचे नेतृत्व पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी केले. बुधवारी जुन्नर येथे मराठा मोर्चा आंदोलन असल्याने दिवसभर पुणे-नाशिक महामार्गावर तुरळक वाहतूक होती.