पिंपरी : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलने, मोर्चे काढले जात आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही शासनाकडून दखल घेतली जात नाही. गावाकडील आर्थिक परिस्थिती बिकट, त्यातच शहरात आल्यानंतरही नोकरीसाठी वणवण अशा परिस्थितीने पिचलेल्या राजेश्वर दिनकर पाटील या २७ वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. अशी तक्रार राजेश्वरचे बंधू ज्ञानेश्वर पाटील यांनी भोसरी पोलिसांकडे केली आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संत तुकारामनगर, आळंदी रस्ता भोसरी येथे राजेश्वर भावाकडे राहत होता. उद्गीर (जि. लातूर) येथील दावणगाव हे त्याचे मूळ गाव आहे. गुरुवारी त्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. राजेश्वर बेरोजगार होता. मराठा आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर नोकरी मिळेल, अशी त्यास अपेक्षा होती. मात्र विविध स्तरांवर आंदोलने, मोर्चे काढूनही मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघत नसल्याने त्यास नैराश्य आले होते. त्यातूनच त्याने आत्महत्या केली आहे, असे ज्ञानेश्वर पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे. मराठा आरक्षणाच्या कारणास्तव त्याने आत्महत्या केली, याबाबतची चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागलेली नाही.
Maratha Reservation : नोकरीच्या नैराश्यातून तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 1:08 AM