लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : ज्याचा महाराष्ट्राच्या मातीशी कधी संबंध आला नाही, अशा व्यक्ती महाराष्ट्रात येऊन मोठ्या होतात. मात्र, मराठी कलाकारांना म्हणावा तसा न्याय मिळत नाही. असेच चालत राहिले तर मराठीत कलाकार तयार होणार नाहीत, अशी खंत आता ज्येष्ठ कलाकरांमध्येही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा मराठी कलाकार जिवंत राहणे गरजेचे आहे, असे स्पष्ट मत खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते गुुरुवारी सिनेकलाकारांना नटवर्य श्रीरामजी गोजमगुंडे रंगकर्मी पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, आमदार संजय केळकर, प्राचार्य नितीन बानगुडे पाटील, महापौर नितीन काळजे, महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक अमित ढाके, नामदेव ढाके, अमित गावडे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, मकरंद अनासपुरे, अनिता दाते, जयवंत वाडकर, सिद्धेश्वर झाडबुके, दिग्दर्शक विवेक वाघ, राहुल वडगावे आदी उपस्थित होते.संभाजीराजे म्हणाले की, महाराष्ट्रात आज सिनेसृष्टीला पूरक असे वातावरण असूनही मराठी कलाकारांना वाव मिळत नाही, रजनीकांत हा मराठी माणूस असून दक्षिण भारतात जाऊन मोठा झाला. ज्येष्ठ मराठी कलाकरांनाही भविष्यात मराठी चित्रपट व त्या कलाकरांच्या स्थिती बिकट दिसत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी व मराठी जनतेनेच मराठी कलाकार जिवंत ठेवला पाहिजे. तरच गोजमगुंडे यांनी रोवलेली अभिनयाची मुहूर्तमेढ शिखरापर्यंत जाईल.अभिनेते मकरंद अनासपुरे, अनिता दाते, जयवंत वाडकर, सिद्धेश्वर झाडबुके, दिग्दर्शक विवेक वाघ यांना नटवर्य श्रीरामजी गोजमगुंडे रंगकर्मी पुरस्कार प्रदान करण्यात आला. अनासपुरे म्हणाले की, तब्बल ३ तपापूर्वी बीडमध्ये निखारे या चित्रपटाचे शुटींग चालू होते. या चित्रपटाचे हिरो होत़े श्रीराम गोजमगुंडे. त्या वेळी मी शाळा बुडवून शुटींगला जायचो व मलाही या चित्रपटात काम करावे असे वाटायचे, ती इच्छा किंवा माझे परिश्रम या पुरस्कारामुळे तीन तपांनी एक वर्तुळ पूर्ण झाले. या वेळी ही दौलत महाराष्ट्राची हा विशेष कार्यक्रम ही सादर करण्यात आला.
मराठी कलाकारांना नाही राज्यात न्याय
By admin | Published: June 30, 2017 3:40 AM