पिंपरी : मराठी भाषेला हजारो वर्षांचा इतिहास असूनही आजतागायत या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. याबाबत २८ एप्रिल २०१५ रोजी केंद्र्र शासनाच्या मंत्रिमंडळ सचिवालयाकडे विचारार्थ पाठविलेल्या प्रस्तावावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली. बारणे म्हणाले, ‘‘दर वर्षी २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. आपली मराठी भाषा बाराव्या शतकापासून चालत आली असून, जगामध्ये मराठी भाषेचा भाषा म्हणून १९ वा क्रमांक लागतो, तर भारतामध्ये मराठी भाषेचा सर्वांत मोठी भाषा म्हणून चौथा क्रमांक लागतो. या भाषेला हजारो वर्षांचा इतिहास असूनही अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी ५० वर्षांपासून संघर्ष करावा लागत आहे.’’ बारणे यांनी मराठीतून बोलताना संपूर्ण मराठी भाषेचा इतिहास सांगितला. त्यांच्या मागणीला लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी मराठीत बोलून सहमती दर्शविली. तसेच लोकसभा उपाध्यक्ष डॉ. एम. थंबी दुराई, मध्यप्रदेशचे खासदार आणि मूळचे मराठी असलेले ज्योतिरादित्य सिंधिया (शिंदे) यांच्याबरोबरच सभागृहाने पाठिंबा दिला. (प्रतिनिधी)
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा
By admin | Published: March 23, 2017 4:26 AM