लोकमत न्यूज नेटवर्कदावडी : येथील अण्णाभाऊ साठेनगर येथे पूर्वीच्या भांडणावरून पाच जणांना (दि. २३ जून) लोखंडी गज, कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले होते. यात मधुकर बाळासाहेब नेटके (वय ४३) यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत मृताच्या नातेवाईकांनी आक्रमक होत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. आरोपींना अटक करा, दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करा. तोपर्यंत मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवण्याची नातेवाईकांनी भूमिका घेतली. याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऊ दिवसांपूर्वी दावडी येथे घरासमोर वाळत टाकलेले कपडे काढण्यासाठी बॅटरीचा उजेड दाखविला, म्हणून आरोपीने हाताने मारहाण केली. याचा जाब विचारण्यासाठी गेले असता बाचाबाची, शिवीगाळ होऊन प्रफुल्ल मधुकर नेटके, मंगल मधुकर नेटके, मधुकर बाळासाहेब नेटके, नवनाथ बाळासाहेब नेटके, गोरक्ष बाळासाहेब नेटके यांना लोखंडी गज, काठी, कुऱ्हाडीने डोक्यात, तोंडावर मारून गंभीर जखमी केले होते. यामध्ये मधुकर बाळासाहेब नेटके (वय ४३) यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी शुभम दत्तात्रय नेटके, अक्षय दत्तात्रय नेटके, सुनीता सचिन सातपुते यांना अटक केली आहे. मारहाण करणाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी भूमिका घेत नातेवाईकांनी राजगुरुनगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. आरोपींना अटक करण्यात येईल, तसेच जे पोलीस कर्मचारी याबाबत दोषी असतील यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पठारे यांनी सांगितल्यावर नातेवाईक शांत झाले.
मारहाणीतील जखमीचा मृत्यू
By admin | Published: July 03, 2017 2:33 AM