पिंपरी : दोन्ही मुलीच झाल्या म्हणून तसेच साडेतीन वर्षे पती सहवासापासून वंचित ठेवून विवाहितेचा छळ केला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रुपनीनगर, तळवडे तसेच हुनसनाळ, ता. हुमनाबाद, जि. बिदर, कर्नाटक येथे जून २०१९ ते ११ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत ही घटना घडली.
संजय शंकर भाईकट्टे (रा. रुपीनगर, तळवडे), सासू पुतळाबाई शंकर भाईकट्टे, सविता महादेव मोरे, हारुबाई तानाजी बोडके, पारुबाई सचिन सुरवसे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यातील संजय भाईकट्टे याला पोलिसांनी अटक केली. लक्ष्मण देवाप्पा कांबळे (वय ५०, रा. बिदर, कर्नाटक) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १२) फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची २२ वर्षीय मुलगी तिच्या सासरी नांदत असताना तिच्या सासरच्यांनी तिचा छळ केला. फ्लॅट खरेदीसाठी माहेरून पाच लाख रुपयांची मागणी केली. दोन्ही मुलीच झाल्या म्हणून पती सहवासापासून सुमारे साडेतीन वर्षे वंचित ठेवले. तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन जीवन जगण्यास असह्य करून आत्महत्येस प्रवृत्त केले.