पिंपरी : माहेरहून हुंडा म्हणून बीअर बार किंवा आईच्या संपत्तीमधील अर्धा हिस्सा आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती पवनकुमार घनवट, सासू संध्या घनवट, सासरा गोपाळ घनवट (सर्व रा. इंद्रेश्वरनगर, एरिगेशन कॉलनी, इंदापूर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जयहिंद कॉलनी, रहाटणी फाटा, थेरगाव येथे राहणाऱ्या २१ वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विवाहिता सासरी नांदत असताना पती, सासू आणि सासरे यांनी माहेराहून हुंडा आणण्याची वेळोवेळी मागणी केली. हुंडा म्हणून सासरच्या मंडळींनी पैसे न मागता विवाहितेच्या आईच्या संपत्तीमधील अर्धा हिस्सा आणावा किंवा बीअर बार सासरच्या मंडळींच्या नावावर करून घ्यावा, अशी मागणी केली. त्यावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करीत उपाशी ठेवून अपरात्री घराबाहेर काढले. विवाहितेच्या आईलाही धमक्या देत शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच विवाहितेच्या मुलाला आरोपींनी स्वत:कडे ठेवून घेतले, यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
बिअरबारसाठी विवाहितेचा छळ : वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 9:14 PM