पिंपरी: विवाहित महिलेला लग्नाचे अमिष दाखवून सात जणांनी मिळून फूस लावून पळवून नेले. त्यानंतर तिच्यावर ब्लेडने वार करून तिला गंभीर जखमी केले. याप्रकरणी पीडित विवाहितेच्या पतीने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २३ मे रोजी चिखली येथे घडली.
सागर विजय उसर (वय २६), प्रवीण विजय उसर (वय २३ ), उमेश उसर, भागवत उसर (वय २६), गोपाळ मोरे, सिद्धू सोळंकी (वय २८), समाधान इंगळे (वय ३२ सर्व रा. चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. संभाजी मुरलीधर मुळे (वय ३०, रा. चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर याने त्याचे नातेवाईक आणि मित्रांसोबत कटकारस्थान रचून फिर्यादी यांच्या पत्नीला (वय २५) लग्न करण्याचे अमिष दाखवले. त्या उद्देशाने तिला फूस लावून पळवून नेले. त्यानंतर तिच्यावर ब्लेडने वार करून तिला गंभीर जखमी केले.
याप्रकरणी फिर्यादी यांनी पिंपरी न्यायालयात सीआरपीसी १५६ (३) प्रमाणे तक्रार दाखल केली. त्यानुसार न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.