पिंपरी : चिखली येथील कुदळवाडी परिसरातील भंगार गोदामासह काही दुकाने व लघुऊद्योग अस्थापनांना सकाळी दहाच्या सुमारास आग लागली असुन आगीत पन्नास पेक्षा अधिक दुकाने जळाल्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. दोन तासा नंतर देखील आग आटोक्यात आली नव्हती. आग आटोक्यात आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी व अधिकारी कर्तव्यावर होते. पोलीस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, महापालिका प्रशासनाच्या सर्व यंत्रणेकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आगीचा धोका ओळखुन एका रहिवाशी इमारतीमधील कुटूंबातील व्यक्ती घराबाहेर काढून इमारत खाली करण्यात आली. सध्या तरी कुठलीही जिवीतहानी न झाल्याचे प्रत्यक्षदर्शिकडून सांगण्यात आले आहे.
'सकाळी सव्वा दहाच्या सुमारास या ठिकाणी आग लागल्याची माहिती मिळाली. संपुर्ण प्रशासकीय यंत्रणेकडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्याआग आटोक्यात आणणे ही प्राथमिकता आहे. त्यानंतर तपास करून दोषींवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येईल.' - प्रदिप जांभळे पाटील (अतिरिक्त आयुक्त, महापालीका)