पिंपरी-चिंचवड - कुदळवाडी येथील भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत चार गोदामं जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 13 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (8 एप्रिल) कुदळवाडी येथील भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. केमिकल, लाकूड, प्लास्टिकचे प्रमाण अधिक असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचण येत आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याआधी काही दिवसांपूर्वी बिबवेवाडी येथील गंगाधाम रोडवरील आईमाता मंदिरा शेजारील सोफा बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली होती. कारखान्यातील सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग लागली होती. मात्र आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. तसेच आगीत 4 दुचाकी जळून खाक झाल्या होत्या.
कुदळवाडी परिसरात पुन्हा अग्नितांडव :फर्निचर दुकानासह हॉटेल आगीच्या भक्ष्यस्थानी
चिखली कुदळवाडी येथील इंद्रायणी वजन काटा परिसरात मंगळवारी (19 मार्च) पहाटेच्या सुमारास फर्निचर दुकान व हॉटेलला आग लागली होती. या आगीमध्ये बरकत अली, राजेश शर्मा, पंडित वाघ, नेहाल खान यांची 3 फर्निचरच्या दुकानाचे व एका हॉटेलचे आगीत जळून नुकसान झाले होते. आगीमध्ये जीवितहानी झाली नसली तरीही लाखो रूपयांचे नुकसान झाले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करत आग आटोक्यात आणली. आगीतून दोन एलपीजी सिलेंडर वेळीच बाहेर काढल्यामुळे मोठी हानी टळली. यावेळी मुख्य अग्निशमन केंद्र पिंपरी, उप अग्निशमन केंद्र चिखली, तळवडे व भोसरी अशा चार अग्निशमन केंद्रातील कर्मचारी यांनी आग विझवण्यासाठी दाखल झाले होते.
पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथे प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग
कोंढवा बुद्रुक येथील तालाब कंपनीजवळ शुक्रवारी (15 मार्च) पहाटेच्या सुमारास प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग लागली होती. या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, कंपनीचे मोठे नुकसान मात्र झाले होते. प्लास्टिकच्या गोडाऊनमधील साहित्य आगीत जळून खाक झाले होते. आग विझवण्यात गणपत पडये, योगेश जगताप, सोपान कांबळे, तेजस खरीवले, अभिजित थाळकर, सौरभ नगरे, प्रदीप कोकरे, विशाल गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले होते.