पिंपरी : औद्योगिक भंगाराला भीषण आग लागली. यात लाखो रुपयांचे टाकाऊ साहित्य खाक होऊन धुराचे लोट उठले. तसेच रासायनिक वापराचे बॅरेल, कॅन यांचे स्फोट झाले. स्फोटांच्या आवाजाने स्थानिक नागरिकांचा थरकाप उडाला. या घटनेने शहर हादरले. पिंपरीतील मोरवाडी येथील लालटोपीनगर येथे न्यायालयाच्या जुन्या इमारतीच्या पाठीमागे बुधवारी (दि. २१) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मोरवाडी येथे लालटोपी नगर आहे. या परिसरात जुन्या न्यायालायच्या इमारतीच्या पाठीमागे नाल्यालगत मोकळी जागा आहे. या जागेवर गेल्या काही वर्षांपासून एमआयडीसीतील कंपन्यांमधील ‘स्क्रॅप’ (टाकाऊ साहित्य) ठेवले जाते. काही व्यावसायिक कंपन्यांकडून हे साहित्य खरेदी करतात. त्यातील धातू, प्लास्टिक आणि इतर वस्तू वेगळ्या करण्याचे काम या जागेत चालते. यात पुठ्ठे, रबर, टायर, केबल, रासायनिक वापराचे साहित्य, बॅरेल, कॅनचा समावेश असतो.
दरम्यान, बुधवारी या स्क्रॅपचे वर्गीकरण केले जात होते. त्यावेळी एका बाजूला आग लागल्याचे काही जणांच्या निदर्शनास आले. त्यांनी जवळच्या एका टपरीवरील बादलीने पाणी टाकून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. त्यानंतर जवळच असलेल्या बोरला नळी लावून पाणी फवारले. मात्र, त्यानंतरही आगीने रौद्ररूप घेतले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.
बघ्यांची गर्दी
आगीत रबर, प्लास्टिक, रासायनिक घटक असलेल्या वस्तू तसेच पुठ्ठे व इतर साहित्याने पेट घेतल्याने मोठ्या प्रमाणात धुराचे लोट तयार झाले. दहा किलोमीटर अंतरावरून आकाशात हे लोट दिसून येत होते. त्यामुळे शेकडो नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. बघ्यांची मोठी गर्दी झाली.
आगीचे कारण अस्पष्ट
आग कशामुळे लागली, याचे कारण सायंकाळी उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. याबाबत परिसरातील नागरिक तसेच स्क्रॅप व्यावसायिकांकडे चौकशी सुरू होती.
जीवित हानी टळली...
आग लागल्याचे निदर्शनास येताच मजुरांची धावाधाव सुरू झाली. आगीने रौद्ररुप धारण केल्याने तसेच मोठ्या प्रमाणात स्फोट होत असल्याने स्थानिक महिला व लहान मुलांची रडारड सुरू झाली. आगीची घटना मोकळ्या जागेत घडल्याने मजुरांना तेथून बाहेर पडणे सहज शक्य झाले. त्यामुळे जीवित हानी टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.