पिंपरी : राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या ऑगस्ट २०२१ मध्ये बदल्या करण्यात आल्या. त्यात पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातून अन्य ठिकाणी बदली झालेल्या तीन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या रद्द केल्या आहेत. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) याबाबत निर्णय दिला. त्यानुसार तीनही निरीक्षकांना पुन्हा पिंपरी- चिंचवड पोलीस आस्थापनेवर हजर करून घेण्यात आले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पिंजण, अमरनाथ वाघमोडे, रंगनाथ उंडे, अशी बदलीचे आदेश रद्द झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत. ऑगस्ट २०२१ मध्ये वरिष्ठ निरीक्षक पिंजण यांची शिरगाव ते गुन्हे अन्वेषण विभाग तर, सांगवीचे वरिष्ठ निरीक्षक रंगनाथ उंडे आणि गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानविज, अशी बदली झाली होती. त्यानुसार, या तिघांनाही पिंपरी- चिंचवड येथून कार्यमुक्त केले होते. त्यानंतर तिघांनीही 'मॅट'मध्ये धाव घेतली.
'मॅट'ने तिघांच्या बदल्या रद्द केल्या. तसेच, त्यांना पुन्हा पिंपरी- चिंचवड आयुक्तलयात हजर करून घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पिंजण, उंडे आणि वाघमोडे या तिघांना नियंत्रण कक्ष येथे हजर करून घेण्यात आले.