पिंपरी : माथाडी कामगार संघटनेच्या नेत्यांची दादागिरी शहरात वाढतच आहे. पोलीस तक्रार करण्यास कोणी पुढे येत नसल्याने ‘तेरी भी चूप आणि मेरी भी चूप’ असे म्हणत सर्व बाजूने आर्थिक कमाई केली जात होती. मात्र, या दादागिरीतून एका व्यावसायिकाला जबरदस्तीने रिक्षातून नेऊन मारहाण करण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. पिंपरी-चिंचवड, तळेगाव, चाकण आणि हिंजवडी या औद्योगिक परिसरात माथाडी कामगार संघटनेची दादागिरी आणि गुंडगिरी वाढली आहे. यामुळे उद्योजक आणि व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. ‘लोकमत’ने या संदर्भात ठळकपणे वृत्त प्रसिद्ध करीत हे गैरप्रकार चव्हाट्यावर आणले होते. उद्योगक्षेत्रातून या वृत्ताचे स्वागत केले गेले. या संदर्भात ठोस कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. असे वातावरण असताना एका बांधकाम व्यावसायिकावर माथाडी कामगार संघटनेचा ठेका देण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केला जात होता. त्यासाठी ब्लॅकमेलिंग सुरू होते. वेगवेगळ्या प्रकारे धमक्या दिल्या जात होत्या. तरीही व्यावसायिकाने ठेका देण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे माथाडी कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना शुक्रवारी रिक्षातून जबरदस्तीने बसवून नेले. मारहाण करीत ठेका देण्याची मागणी केली. याबाबत व्यावसायिकाने वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नेहमीप्रमाणे आपल्या पद्धतीने तपास करीत आहेत. औद्योगिक क्षेत्रासह बांधकाम, शॉपिंग मॉल आदींसह वेगवेगळ्या क्षेत्रांत माथाडी संघटनेची दादागिरी आणि गुंडगिरी वाढतच आहे. वेगवेगळ्या पद्धतीने धमक्या आणि दबावतंत्राचा वापर करीत ठेका देण्यास भाग पाडले जाते. (प्रतिनिधी)
माथाडी नेत्यांची वाढली दादागिरी
By admin | Published: January 04, 2016 12:59 AM