पिंपरी : मावळ लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होत आहे. उमेदवारीपासून तर मतदान आणि मतदानापासून मतमोजणीपर्यंत मावळची निवडणूक चर्चेत राहीली. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी दुरंगी लढत दिसून आली. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी उमेदवारी, निवडणूक प्रचारआणि मतदानापर्यंतच्या टप्प्यांमध्ये घासून होणार असल्याचे दिसून आले. तसेच या मतदार संघात एक सुप्त लाट असल्याचे दिसून आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कि उद्धव ठाकरे अशी कोणाची ताकद हेही समजणार आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये पुणे जिल्ह्यातील घाटावरील पिंपरी, चिंचवड आणि मावळ तर घाटाखालील पनवेल, कर्जत, उरण यात सहा मतदारसंघांचा समावेश होतो. यंदाच्या मावळ लोकसभा निवडणुकीमध्ये ३३ उमेदवार रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत एकूण २५ लाख ८५ हजार ०१८ मतदार होते. त्यापॆकी ७ लाख ७७ हजार ७४२ पुरुष तर, ६ लाख ४० हजार ६५१ महिलांनी असे ५४. ८७ टक्के मतदान झाले होते. महायुतीच्या वतीने शिवसेना (शिंदे) गटाचे खासदार श्रीरंग बारणे तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे हे रिंगणात होते. दुरंगी लढत वाटत असली तरी या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी, बसप, रिपब्लिकन पक्ष आणि अपक्ष यासह ३३ उमेदवार रिंगणात उतरले होते. वाघेरे आणि पाटील म्हणून लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्या नामसाधर्म्याचे नाशिकचे सुभाष विष्णू वाघेरे, रायगड लालासाहेब पाटील, नारायण पाटील आणि रवींद्र पाटील असे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यामुळे दोन पक्षात चुरस आहे हे ठळकपणे दिसत होते.
एकतर्फी वाटणारी निवडणूक चुरशीची कशी झाली
लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली तेव्हा, महविकास आघाडीकडून कोण असणार? हे निश्चित झाले होते. तर महायुतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरु होते. सुरुवातीच्या कालखंडामध्ये खासदार श्रीरंग बारणे अर्थात महायुतीसाठी ही निवडणूक एकतर्फी होईल,असे वाटत होते. त्यानंतर प्रचारात देशपातळीवर तसेच स्थानिक पातळीवरील मुद्द्यांवर चर्चा झाली. त्याचबरोबर स्थानिक पातळीवरील न सुटलेले प्रश्न यावर ठळकपणे चर्चा झाली. तसेच महायुतीतील नेत्यांमधील वर्चस्ववाद आणि अंतर्गत धुसफूस उघडपणे होती. तसेच शिवसेना शिंदे गटाच्या मतदारसंघावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दावा केला होता. त्यानंतर निवडणुकीमध्ये व्यासपीठावर महायुतीचे नेते दिसून आले, प्रत्यक्ष काम किती जणांनी केले, हे मतमोजणीतून उघड होणार आहे. महायुतीतील स्थानिक नेत्यांमधील असणारी अनास्था, अस्वस्थता यावर लक्ष महाविकास आघाडीने लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आहे. त्यामुळे एकतर्फी वाटणारी निवडणूक ही घासून होत असल्याचे दिसून आले.
नेते आले पण...
महायुतीच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, मंत्री उदय सामंत, माजी मंत्री पंकजा मुंडे, अभिनेते गोविंदा असे विविध नेते आणि अभिनेते आजवर येऊन गेले. तर महाविकास आघाडीच्या वतीने राज्यातील उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते नाना पटोले, आपचे खासदार संजय सिंह, खासदार संजय राऊत, संपर्कप्रमुख सचिन अहिर अभिनेते येऊन गेले. पिंपरी- चिंचवडमध्ये पंतप्रधान मोदी यांची सभा झाली नाही. पुण्यातच एक सभा झाली. स्टारप्रचारकांची कमतरता जाणवली.