वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी मतदान होत असून, प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. प्रथमच जनतेतून सरपंच निवड होणार असल्याने या निवडणुकीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. या निमित्ताने गावातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या होत्या. बहुतेक सर्वच गावांत चुरशीच्या लढतीचे संकेत आहेत. तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदाच्या ८१ पैकी ३६ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित ४५ जागांसाठी ९८, तर आठ सरपंचपदांसाठी २७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. या उमेदवारांचे भवितव्य मतदार ठरविणार आहेत.इंदोरीच्या सरपंचपदासह सदस्यांच्या १७पैकी १६ जागा बिनविरोध झाल्या आहेत. फक्त एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. तालुक्यातील इंदोरी, निगडे, गोडुंब्रे, शिरगाव, देवले, वरसोली, भोयरे,सावळा व कुणेनामा या नऊ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. या ८१ जागांसाठी २२५ जणांनी, तर सरपंच पदासाठी ५३ जणांनी अर्ज दाखल केले होते. यापूर्वी सदस्यत्वासाठी अर्ज केलेल्या ९१, तर सरपंचपदासाठी अर्ज केलेल्या २५ जणांनी माघार घेतली. शिरगाववगळता इतर आठ ग्रामपंचायतींमधील ३६ जागा बिनविरोध झाल्या. त्यामुळे आता ४५ जागांसाठी ९८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. इंदोरीचे सरपंचपद बिनविरोध झाले असून उर्वरित आठ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी २७ उमेदवार रिंगणात आहेत.इंदोरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कीर्ती सुनील पडवळ या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. दिनेश चव्हाण, लीलावती शेवकर, योगेश शिंदे, विक्रम पवार, नितीन ढोरे, गीता हिंगे, अंकुश ढोरे, मनीषा शेवकर, संगीता राऊत, राजू केदारी, मंगल ढोरे, प्राजक्ता आगळे, प्रशांत भागवत, कविता चव्हाण हे १५ उमेदवार सदस्यपदी बिनविरोध विजयी झाले आहेत.येथे प्रभाग क्रमांक पाचमधील सर्वसाधारण असलेल्या एका जागेसाठी पाच उमेदवार रिंगणात राहिले आहेत. निगडे ग्रामपंचायतीच्या नऊपैकी एका जागेवर जयश्री विशाल हेगाडे या बिनविरोध झाल्या असून, उर्वरित आठ जागांसाठी १६ उमेदवार, तर सरपंचपदासाठी दोन उमेदवार रिंगणात राहिले आहेत.गोडुंब्रेत तीन बिनविरोध१ गोडुंब्रे ग्रामपंचायतीच्या सात जागांपैकी कांचन चंद्रकांत आगळे, सारिका सचिन कदम व जान्हवी किशोर सावंत हे तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले असून, उर्वरित चार जागांसाठी आठ उमेदवार, तर सरपंचपदासाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. सावळांच्या सात जागांपैकी सुनीता गोटे, दत्तात्रय चव्हाण, शीतल घारे, कैलास करवंदे हे चार उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. उर्वरित तीन जागांसाठी सहा उमेदवार व सरपंचपदासाठी तीन उमेदवार रिंगणात राहिले आहेत. भोयरेच्या सातपैकी एका जागेवर मारुती वाघमारे बिनविरोध विजयी झाले असून, उर्वरित सहा जागांसाठी १२, तर सरपंच पदासाठी दोन उमेदवार रिंगणात राहिले आहेत.२ वरसोलीच्या नऊ जागांपैकी मीना शिंदे, सीमा ठोंबरे, विलास चौधरी, रंजनी कुटे व सोनिया येवले हे बिनविरोध विजयी झाले असून, उर्वरित चार जागांसाठी नऊ, तर सरपंचपदासाठी चार उमेदवार रिंगणात राहिले आहेत. शिरगावच्या नऊ जागांसाठी २१ उमेदवार, तर सरपंच पदासाठी पाच उमेदवार रिंगणात राहिले आहेत. कुणे नामाचा नऊ जागांपैकी नमिता पिंगळे, रामदास पांडवे, राणी भोरडे व सारिका लांडगे या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. उर्वरित पाच जागांसाठी ११, तर सरपंचपदासाठी चार उमेदवार रिंगणात राहिले आहेत. देवलेच्या सात-सात जागांपैकी शारदा उंबरकर व सुरेखा जगताप हे दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. उर्वरित पाच जागांसाठी दहा, तर सरपंचपदासाठी तीन उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
मावळ तालुका : आठ सरपंचपदांसाठी २७ उमेदवार, थेट निवडीमुळे उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 2:57 AM