वडगाव मावळ : तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाल्यानंतर वडगाव येथे गुलालाची मुक्त उधळण करीत जल्लोष केला. निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.या निवडणुकीत सरपंचपदाचे उमेदवार थेट जनतेतून निवडून आले. या निवडणुका पक्षीय चिन्हावर लढवल्या गेल्या नाहीत. त्यामुळे कोणत्या पक्षाच्या ताब्यात गावाची सत्ता गेली याबाबत संभ्रमाचे चित्र असले, तरी निकालाचा कल पाहिल्यास ग्रामपंचायतीत राजकीय उलथापालथ झाली आहे.ही निवडणूक पक्षीय चिन्हावर नसल्याने आता सर्वच पक्षांकडून यशाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. सरपंचपदाचे उमेदवार पक्षाचे चिन्ह न घेता जनतेतून निवडून आल्याने ग्रामपंचायतीवर सत्ता नेमकी कुणाची यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. यावरून भविष्यात ग्रामपंचायतींच्या कारभारात राजकीय रणकंदन अपेक्षित असले, तरी जनतेतून सरपंच निवडून आल्यामुळे सर्वत्र यशाचा जोरदार जल्लोष करण्यात आला.निकालादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. सकाळी दहाला महसूल भवनात मतमोजणीस सुरुवात झाली.थेट जनतेतून सरपंच निवडून येणार असल्याने वडगाव मावळ येथील महसूल भवनाच्या परिसरात तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यापूर्वी मुंढावरे ग्रामपंचायत सरपंचपद बिनविरोध पार पडली आहे.
मावळ तालुका : ग्रामपंचायत निवडणुकीने राजकीय उलथापालथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 6:50 AM