कामशेत : मावळ तालुक्यात खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कामशेत शहरासह मावळातील ठरावीक भागात वारंवार वीज खंडित होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे अनेक व्यावसायिक व नागरिक त्रस्त झाले आहेत.शहरातील देवराम कॉलनी, संभाजी चौक, शिवाजी चौक ते गणेश मंगल कार्यालयापर्यंतच्या परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. विजेचा पुरवठा कमी दाबाचा होत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. शहरातील या भागांमध्ये पीठ गिरण्या, वेल्डिंग शॉप, हॉस्पिटल, हॉटेल, लॉन्ड्री व्यावसायिक, इलेक्ट्रॉनिक्स-इलेक्ट्रिकल दुकाने, प्रिंटिंग प्रेस आदी व्यावसायिक आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, विजेचा दाब कमी असण्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरात सध्या नोटबंदीमुळे सर्वच बँकांमध्ये खातेदारांची मोठी गर्दी असताना वारंवार वीज गुल होण्याच्या घटनांमुळे बँकांचे कामकाज ठप्प होत आहे. कामशेत महावितरण कार्यालयात तक्रार द्यायला गेल्यास अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसतात. कार्यालय नेहमीच बंद असते, अशी नागरिक तक्रार करीत आहेत. संबंधित प्रशासनाचा त्यांच्यावर वचक नसल्याने वीज ग्राहकांची ससेहोलपट सुरू आहे. वेळेवर न मिळणारे विजेचे भरमसाठ बिल आल्यावर लगेच भरूनसुद्धा सेवा दिली जात नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याशिवाय बिल एक महिना उशिरा भरले, तर लगेच महावितरणचे कर्मचारी वीज तोडण्यासाठी येतात. यामुळे नागरिक जास्त त्रस्त आहेत. (वार्ताहर)
मावळात वारंवार बत्ती गुल
By admin | Published: December 23, 2016 12:28 AM