खडकी : खडकीच्या महावितरण विभागाचे अनेक इरसाल किस्से प्रकाशझोतात येत असताना आणखी एका भयानक प्रकाराची त्यात भर पडली आहे. वीज बंदची तक्रार देण्याकरिता आलेल्या ग्राहकालाच महावितरणची गाडी चालवावी लागली व पुन्हा वीज वितरण कार्यालयात आणून सोडावी लागली. यामुळे खडकीतील महावितरणचा अनागोंदी कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
खडकी बाजार येथील युवक काँग्रेस ब्लॉकचे पदाधिकारी प्रशांत गवळी हे महावितरणच्या खडकीतील कार्यालयात वीज बंद पडल्यामुळे तक्रार देण्याकरिता आले होते. रात्रीची वेळ असल्याने कार्यालयात मोजकेच एक-दोन कर्मचारी होते. कार्यालय आवारात दुरुस्ती करण्यासाठी जाणारी चारचाकी गाडी होती. मात्र, ती गाडी चालवण्यासाठी चालकच नव्हता. त्यामुळे भलतीच पंचाईत झाली होती. गवळी यांनी विनंती करूनही महावितरणला चालक उपलब्ध झाला नाही आणि गाडीशिवाय काम होऊ शकत नाही, हे कर्मचाऱ्यांनी गवळी यांना स्पष्ट सांगितले. आता काहीच पर्याय शिल्लक नाही, हे लक्षात येताच गवळी स्वत: शिडी मांडलेली टेम्पोगाडी चालवण्यास तयार झाले. या पर्यायाला कर्मचारीही तयार झाले. गवळी यांनी स्वत: गवळीवाडा येथे कर्मचाऱ्यांना गाडीत बसून नेले .कर्मचाऱ्यांनी बिघाड दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत केला. दोन तास अथक प्रयत्न केल्यानंतर गवळी यांनी टेम्पो पुन्हा वीज वितरण कार्यालयात नेऊन सोडला. यापुढे जर परिसरात विजेमुळे एखादी दुर्घटना घडली आणि महावितरणच्या गाडीला चालकच नसेल, तर होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. (वार्ताहर)