वडगाव मावळ : कला-क्रीडा संस्कृतीचा खजिना असलेला मावळ फेस्टिव्हल येथील ग्रामदैवत पोटोबामहाराज मंदिर प्रांगणात २३ ते २६ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. फेस्टिव्हलचे संस्थापक प्रवीण चव्हाण, अध्यक्ष सुनीत कदम, कार्यक्रम प्रमुख दत्तात्रय लंके यांनी या वर्षीच्या कार्यक्रमाची माहिती पत्रकार परिषदेत दिली. कार्याध्यक्ष गुलाबराव म्हाळस्कर,उपाध्यक्ष किरण म्हाळस्कर, सुरेश जांभूळकर, रवींद्र काकडे, श्यामराव ढोरे, नामदेव ढोरे, नितीन कुडे आदी उपस्थित होते. फेस्टिव्हलचे उद्घाटन शुक्रवारी (दि. २३) सायंकाळी साडेपाचला राज्याचे सहकार व वस्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी पालकमंत्री गिरीश बापट असतील. माजी मंत्री मदन बाफना, खासदार श्रीरंग बारणे, खासदार वंदना चव्हाण, आमदार बाळा भेगडे, महेश लांडगे, माजी मंत्री चंद्रकांत छाजेड, माजी आमदार रुपलेखा ढोरे, दिगंबर भेगडे आदी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर नवीन प्रभाकर यांचा कॉमेडी शो होईल. भूषण कडू, किशोर चौघुले, मीरा मोडक, अंकुश वाढावे, मुकेश जाधव आदींचा त्यात समावेश आहे. कार्यक्रमाच्या आधी गोपूजन करण्यात येणार आहे. येथील ऐतिहासिक तळ्यामध्ये कारंजे व लेझर शो यंदाचे मुख्य आकर्षण आहे.शनिवारी (दि. २४) इंडिया गॉट टॅलेंट कार्यक्रमात महाकाली, कृष्णा अॅक्ट, मल्लखांब, स्पीड पेंटिंग, चिल्ड्रन अॅक्ट, लेझर शो व स्थानिक कलाकारांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होईल. संजय केणी व तुषार सावंत सूत्रसंचालन करतील. रविवारी (दि.२५) अभिनेत्री नेहा पेंडसेनिर्मित धमाका २०१६ हा कार्यक्रम होईल. (वार्ताहर)
‘मावळ फेस्टिव्हल’ उद्यापासून
By admin | Published: December 22, 2016 1:54 AM