पिंपरी : धार्मिक, उत्सव आणि सणांसंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करून भविष्यात प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात येतील. संदर्भातील निर्णय अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. पुढील वर्षीपासून पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल होईल, त्यात खंड पडणार नाही, असे महापौरांनी जाहीर केले. न्यायालयाच्या आदेशाचे कारण देऊन या वर्षी दिंडी प्रमुखांना देण्यात येणारी भेटवस्तू, पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल, गणेशोत्सव सजावट स्पर्धा, गणेशोत्सवातील स्वागत कक्ष न उभारल्याबद्दल सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर टीका झाली होती. त्यामुळे महापौर राहुल जाधव यांनी बैठक घेतली. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, विरोधीपक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहर सुधारणा समिती सीमा चौगुले, जैवविविधता समिती सभापती उषा मुंडे, सहायकआयुक्त अण्णा बोदडे, आदी उपस्थित होते.प्रशासनाने चुकीची माहिती दिली, न्यायालयाच्या आदेशावर बैठक घेऊन चर्चा होणे गरजेचे होते. मात्र, प्रशासनाने सजगता दाखविली नाही, याबाबत सत्ताधाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. न्यायालय आदेशाचे अवडंबर माजविले गेले आहे. या आदेशाचा अभ्यास अधिकाऱ्यांनी केलेला नाही, ही दुर्देवाची बाब आहे. त्यामुळे टीकेचे धनी पदाधिकारी झाले आहेत.. सत्तारूढ पक्षनेते पवार म्हणाले, न्यायालयाच्या आदेशास अधिन राहूनच आपल्याला काम करायचे आहे. याबाबत प्रशासनाने न्यायालयीन आदेशाचा अभ्यास करायला हवा. आपण कोणते उपक्रम राबवू शकतो किंवा नाही. याबाबत पदाधिकाऱ्यांनी माहिती देणे गरजेचे आहे. न्यायालय आदेशाचा अवमान होणार नाही. आणि प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यावर भर दिला जाणार आहे. राहुल कलाटे म्हणाले, न्यायालय आदेश आल्यानंतर यासंदर्भात अधिकाऱ्यांनी तातडीची बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना माहिती देणे गरजेचे होते. तसे झाले नाही. पालखी सोहळ्यातील भेटवस्तू, गणेश सजावट स्पर्धा, पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हलवरून टीका झाल्याने अधिकाऱ्यांना जाग आली आहे. कार्यक्रम दरवर्षी होत असतात. त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.महापौर राहुल जाधव म्हणाले, कोणतीही परंपरा खंडित करण्याचा उद्देश नाही. न्यायालय आदेशाच्या अधिन राहून प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यावर भर देणार आहे. तसेच ट्रस्टची स्थापना करून त्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हलचेही आयोजन केले जाणार आहे.
पुढील वर्षीपासून पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल होणार : महापौर राहुल जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 8:04 PM
धार्मिक, उत्सव आणि सणांसंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करून भविष्यात प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात येतील.
ठळक मुद्देप्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यावर भर दिला जाणार