रहाटणी : महापालिका शाळांची महापौर राहुल जाधव यांच्याकडून पाहणी करण्यात येत आहे. पाहणीदरम्यान महापौर जाधव विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. विद्यार्थ्यांना काही प्रश्नही विचारण्यात येतात. या वेळी विद्यार्थी गोंधळल्याचे काही शाळांच्या पाहणीत निदर्शनास आले. अशाच पद्धतीने महापौर जाधव यांनी पिंपळे सौदागर येथे पाहणी दरम्यान विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनी अचूक उत्तरे दिली. त्यामुळे महापौरांनी समाधान व्यक्त केले.
महापालिका शिक्षण मंडळातर्फे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक सोयी सुविधा पुरविल्या जातात. मात्र या सुविधा विद्यार्थ्यांपर्यंत पोहचतात की नाही, तसेच शिक्षण पद्धत, वर्ग-खोल्यांची परिस्थिती, शिक्षणाचा दर्जा यासह अन्य बाबींची पाहणी पिंपळे सौदागर येथील अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयात महापौर राहुल जाधव यांनी केली. नगरसेवक नाना काटे यांनी त्यांचे या वेळी स्वागत केले. महापालिका शिक्षण समितीच्या सभापती सोनाली गव्हाणे, शिक्षण समितीचे अधिकारी, शाळेतील शिक्षक आदी या वेळी उपस्थित होते.महापौर जाधव व नगरसेवक नाना काटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले. त्याचे अचूक उत्तरे या वेळी विद्यार्थ्यांनी दिली. दर वर्षी या विद्यालयातील अनेक विद्यार्थी दहावीत गुणवतायादीत येतात, तर महापालिकेच्या बक्षीस योजनेचाही लाभ घेतात. या यशाबद्दल शिक्षकांचे अभिनंदन केले. वर्गखोल्यांची, मैदानाची पाहणी करण्यात आली. शाळेला सोयी सुविधा वेळेवर देण्यात याव्यात, अशा सूचना महापौरांनी अधिकाऱ्यांना दिल्या.