पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेवर सत्ता खेचून आणण्यासाठी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यांच्या प्रयत्नांना अपेक्षित यश आले असून, यापुढे शहर पातळीवर पक्षात त्यांचा शब्द प्रमाण मानला जाणार आहे. या वेळी महापौरपद ओबीसीसाठी राखीव असून, भोसरीचे अथवा चिंचवडचे आमदार सुचवतील, त्यानुसार महापौरपदाचा निर्णय घेतला जाणार आहे. महापौरपदावर दावा भोसरीचा की चिंचवडचा हे लवकरच स्पष्ट होणार आहे.जुन्या-नव्यांचा मेळ साधताना, भाजपाला ज्येष्ठांना डावलून नव्याने पक्षात आलेल्यांना उमेदवारी द्यावी लागली. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्ते नाराज झाले, वेळीच त्यांची नाराजी दूर करण्यात पक्षश्रेष्ठी यशस्वी झाले. त्यामुळे भाजपाला महापालिकेत सत्ता काबीज करण्याइतपतचे नगरसेवक निवडून आणणे शक्य झाले. नाराजी दूर करण्यात भाजपाचे पदाधिकारी यशस्वी झाले. त्याच वेळी त्यांनी अर्धा विजय मिळवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुरूवातीला आमदार महेश लांडगे भाजपात दाखल झाले,त्यानंतर चिंचवडचे आमदार जगताप यांच्या मदतीने आझम पानसरे यांनाही भाजपात आणून बेरजेचे समीकरण जुळविले. (प्रतिनिधी)
महापौर भोसरी की चिंचवडचा?
By admin | Published: February 24, 2017 3:01 AM