पिंपरी : एक वर्षांचा कालावधी संपल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर शकुंतला धराडे यांच्या बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. या पदासाठी रामदास बोकड आणि आशा सुपे यांचे नाव चर्चेत आहे. सुपे यांची या पदावर वर्णी लागणार असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.पिंपरी-चिंचवडचे महापौरपद अनुसूचित जाती-जमातींसाठी आरक्षित आहे. या पदासाठी धराडे यांना संधी देताना अडीच वर्षांत तिघांना संधी देण्याचा विषय झाला होता. हे आरक्षण निश्चित झाल्यानंतर आमदार लक्ष्मण जगताप गटाच्या नगसेविका धराडे यांना संधी मिळाली. त्यांची निवड २०१३ मध्ये झाली. दरम्यानच्या कालावधीत विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक झाली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला अपयश आले. त्यामुळे संघटनात्मक बांधणीसाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जातीने लक्ष दिले. त्यानुसार स्थायी समिती, विषय समित्यांच्या निवडीत पक्षाचे काम करणाऱ्यांनाच संधी देऊन बंडखोरांना स्थान नाही, असा संदेश दिला होता. धराडे यांच्यावर जगताप गटाचा शिक्का आहे. मात्र त्यांनी ‘मी राष्ट्रवादीची आहे. राष्ट्रवादीचेच काम करणार’ अशी भूमिका त्यांनी मांडली. शिवाय सत्तारूढ पक्षालाही त्यांचा उपद्रव नसल्याने त्यांनाच कायम ठेवावे, अशी भूमिका सत्ताधारी राष्ट्रवादीतील एका गटाची आहे. मात्र, २०१७ ची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून काही बदल करण्याचेनियोजन केले आहे. २० डिसेंबरला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा शहराच्या वतीने गौरव केला जाणार आहे. त्यानंतर महापौर बदलाचा निर्णय होईल, असे राष्ट्रवादीच्या एका नेत्याने सांगितले.(प्रतिनिधी)सुपे यांना संधी?धराडे यांच्यानंतर कोणाला संधी मिळणार, ही चर्चा रंगली आहे. बोकड यांच्यावर आमदार जगताप गटाचा शिक्का आहे. जगताप सध्या राष्ट्रवादीत नाहीत. त्यांच्या नावाचा कितपत विचार होणार? सुपे या माजी आमदार विलास लांडे गटाच्या आहेत. शिक्षण मंडळ निवडणुकीत जगताप गटाला झुकते माप दिले. महापौरपदी लांडे गटाला प्राधान्य मिळू शकते.
महापौर बदल हालचालींना वेग
By admin | Published: December 16, 2015 2:57 AM