ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 14 - पिंपरी-चिंचवड महापालिका महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीतून अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसने माघार घेतल्याने महापौरपदी भाजपाचे नितीन काळजे आणि उपमहापौरपदी शैलजा मोरे यांची बिनविरोध निवड झाली.पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसला हटवून भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश संपादन केले. १२८ पैकी ७७ जागा मिळवून एकमुखी सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर महापौर आणि उमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसनेही महापौरपदासाठी श्याम लांडे आणि उपमहापौरपदासाठी निकिता कदम यांचे अर्ज दाखल केले होते. त्यामुळे निवडणूक होणार असल्याचे निश्चित झाले होते. दरम्यान, महापालिका भवनात सकाळी दहापासून नगरसेवक येण्यास सुरूवात झाली. प्रवेशद्वारासमोरच उद्यान विभागाच्या वतीने नगरसेवकांचे स्वागत करण्यासाठी फुलांची मोहक सजावट केली होती. महापालिका पहिल्या मजल्यावरील यशवंतराव चव्हाण सभागृहात निवडणुकीचे कामकाज सकाळी ११ला सुरू झाले. भाजपाचे महापौरपदाचे उमेदवार नितीन काळजे हे आमदार महेश लांडगे यांच्यासह बैलगाडीतून महापालिका भवनात दाखल झाले. तर भाजपाचे अन्य नगरसेवक महासाधू मोरया गोसावी समाधी मंदिर व क्रांतिवीर चापेकर स्मारकात दर्शन घेऊन महापालिकेत आले होते. भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी भगवे फेटे बांधलेले होते. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी पीठासन अधिकारी यांनी कामकाजास सुरुवात केली. नगरसचिव उल्हास जगताप यांनी निवडणूक कामकाजाची माहिती दिली. टप्पे सांगितले. प्रारंभी महापौरपदाच्या उमेदवारी अर्जाची छाननी झाली. त्या वेळी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश नगरसेवक उपस्थित नव्हते. भाजपाचे काळजे व राष्ट्रवादीचे श्याम लांडे यांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. त्यानंतर माघारीसाठी पंधरा मिनिटे वेळ देण्यात आला होता. त्याच वेळी सुरुवातीला विरोधी पक्षनेते योगेश बहल, मावळत्या सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम यांच्यासह एकेक करून नगरसेवक सभागृहात दाखल झाले. उमेदवारी अर्ज माघारीच्या दोन मिनिटे अगोदर लांडे यांनी अर्ज मागे घेतला. त्यानंतर देसाई यांनी काळजे यांची बिनविरोध निवड जाहीर केली. या वेळी भाजपाच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर साडेअकराला उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीला मोरे आणि कदम यांच्या अर्जांची छाननी करून अर्ज वैध ठरविण्यात आले. त्यानंतर माघारीसाठी पंधरा मिनिटांचा कालावधी देण्यात आला. मुदत पूर्ण होण्यापूर्वी कदम यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे मोरे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. आजचा हा ऐतिहासिक प्रसंग आहे. महापौर आणि उपमहापौरपदाची निवड बिनविरोध झाली. निवडणुकीत राजकारण होत असते. निवडडणूक झाल्यानंतर समाजकारण केले जाते. विकासात कोणतेही राजकारण केले जाणार नाही. निवडणुकींमध्ये एका मताने एखाद्याचा कार्यक्रम केला जातो. मात्र, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांनी ही निवड बिनविरोध केली. हा चांगला पायंडा घालून दिला आहे. त्यामुळे भविष्यात सर्वांच्या साथीने कार्यक्रम विकासालाच प्राधान्य दिले जाईल. केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने या भागाचा विकास केला जाईल. आदर्श कारभार करून दाखवू. - गिरीश बापट (पालकमंत्री)