पिंपरी : महापालिका परिसरातील पावसामुळे झालेल्या खड्ड्यांची दखल महापौर नितीन काळजे यांनी घेतली असून, पावसामुळे पडलेले खड्डे दोन दिवसांत बुजवा, अन्यथा कारवाई केली जाईल, असे आदेश प्रशासनास दिले आहेत.शहरातील खड्ड्यांबाबत मनसेच्या वतीने आंदोलन झाले. त्यानंतर महापौरांनी अधिकाऱ्यांना बोलावून खड्ड्यांची परिस्थितीची माहिती घेतली. या वेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, शहर अभियंता अंबादास चव्हाण उपस्थित होते. या वेळी महापौरांनी शहरातील खड्ड्यांची सद्य:स्थिती काय आहे, अशी माहिती विचारली. शहरातील खड्ड्यांची माहिती घेतली. त्यावर चव्हाण म्हणाले, ‘‘रस्ते खोदाईची कामे, पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण वाहिन्या यामुळे शहरात खड्डे पडलेले आहेत. शहरातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. ऐंशी टक्के खड्डे बुजवले आहेत. शहरात एकूण २०१५ खड्ड्यांपैकी १७५४ खड्डे बुजविले असून, २६१ शिल्लक आहेत. आधुनिक तंत्रज्ञान जेट पॅचरचा वापर करून खड्डे बुजविले जात आहेत. पुढील काही दिवसांत हे काम पूर्ण होईल.’’पावसामुळे खड्डे पडले आहेत. अशा तक्रारी माझ्याकडेही आल्या आहेत. त्यामुळे खड्डयांमुळे नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. काहीही करून हे खड्डे दोनच दिवसांत भरले गेले पाहिजेत. त्यानंतर खड्ड्यांमुळे अपघात झाला तर प्रशासनास जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा महापौर काळजे यांनी दिला. ‘‘पावसामुळे झालेले रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांत हे काम बरचसे पूर्ण झाल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे.आधुनिक तंत्रज्ञानाने खड्डे भरण्यात येणार आहेत, असे एकनाथ पवार यांनी सांगितले.
दोन दिवसांत खड्डे बुजवा, महापौर नितीन काळजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 2:04 AM