पिंपरी : वाकड- ताथवडे- पुनावळे हा परिसर एक प्रभाग नसून तीन गावे आहेत व याच परिसरातून महानगरपालिकेला जास्त मिळकत कर व सर्वात जास्त बांधकाम परवानगी विभागाला विकास निधी मिळतो हे सुद्धा महापौरांना माहीत नाही, महापौर असलो तरीही कोणाच्यातरी हातातले बाहुले आहोत आणि स्वतःचा खेळ करत आहोत हे सुद्धा त्यांना समजत नाही. त्यामुळे महापौर नक्की शहराच्या की भाजपच्या आहेत ? असा प्रश्न उपस्थित होतो, असा प्रश्न शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यानी केला आहे.
वाकड येथील विकास कामावरून महापौर उषा ढोरे यांनी आयुक्तावर निशाणा साधला होता. शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, '' एका विशिष्ट नेत्यांच्या घरातले कामगार आहोत का? असा महापौर यांच्याविषयी प्रश्न पडतो. संपूर्ण शहराच्या व २५ लाख लोकसंख्येच्या महापौर आहात हे त्यांनी लक्षात घ्यावे. ज्या आयुक्तांनी भाजपच्या ठराविक लोकांना कोट्यवधी रुपये लाटण्यासाठी संधी दिली आता तेच आयुक्त तुम्हाला भ्रष्टाचार व टक्केवारी घेण्यासाठी आमच्या वाकड-पुनावळे-ताथवडे भागात विकास कामे करत आहेत असे दिसायला लागले. ........................ महापौर महोदय, या प्रश्नांची उत्तरं द्या ...
१) राज्य शासनाने शेकडो कोटी रुपये खर्चास भोसरी मतदारसंघात मोशी येथील सफारी पार्कला मंजुरी दिली आहे. तुम्ही महापौर म्हणून तोसुद्धा एकाच प्रभागात खर्च होणार आहे, त्याला आपण विरोध करणार का?
२) चऱ्होली भागात शेकडो कोटींची कामे चालू आहेत त्यालाही विरोध करणार का? पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर या ठिकाणी तर स्मार्ट सिटीची शेकडो कोटी रुपयांची कामे चालू आहेत ती पण कामे बंद करणार का?
३) सिमेंट कॉंक्रीट व डांबरीकरण या कामातला फरक ऐकायचा व पहायचा असेल तर पिंपळे गुरव मध्ये सर्व डांबरी रस्ते उखडून टाकून स्मार्ट सिटी ची कामे करून खर्चाचा आकडा फुगवला ते दिसत नाही का?
४) मागील सर्वसाधारण सभेत स्वतःच्या सांगवी व पिंपळे गुरव ह्या भागात १०० कोटी वरून जास्त रक्कमेचे वर्गीकरण केले त्यावेळी संपूर्ण शहराची आठवण का नाही झाली. ............. दुसऱ्याच्या हातातले बाहुले बनू नका... कलाटे म्हणाले, दुसऱ्याच्या हातातले बाहुले असल्याने दुसऱ्याच्या नजरेने त्या पदावरून शहराला पाहणे चुकीचे आहे. उलट शहरातील प्रत्येक भागात जास्तीत जास्त कामे होत असतील तर आयुक्तांनी महाराष्ट्र शासनाला पिंपरी-चिंचवड ची आर्थिक परिस्थिती भक्कम असल्याचे सांगून चूक केली आहे का? आयुक्तांनी कुठल्याही प्रकारची खोटी माहिती दिली नाही आपल्या नेत्याच्या मनाविरुद्ध वागले तर लगेच आयुक्तांनी खोटी माहिती दिली असे तांडव करायचे.''