लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापौर नितीन काळजे यांची सरकारी मोटार सोमवारी अचानक बंद पडली. त्यामुळे महापौरांनी महापालिकेला दांडी मारली. वारंवार तक्रार करूनही मोटार व्यवस्थित दुरुस्त केली जात नसल्याबाबत महापौरांनी संताप व्यक्त केला आहे. महापौरांनी गाडीबाबत यापूर्वीही तक्रारी केल्या होत्या; मात्र, प्रशासन दखल घेत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर अनावश्यक खर्चाला आळा घालण्यासाठी पक्षनेते एकनाथ पवार आणि स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी महापालिकेचे वाहन नाकारले होते. त्यानंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी लाल दिवा काढून टाकण्याचा निर्णय झाल्यानंतर महापौर नितीन काळजे यांनी गाडीचा दिवा काढला नव्हता. महापौरांना लाल दिव्याच्या वाहनाचा सोस असे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. त्यानंतर महापौरांनी दिवा काढून टाकला. त्याच वेळी गाडी बंद पडत असल्याची तक्रार त्यांनी केली होती. महापौरांना वाहन सेवेसाठी महापालिकेने मोटार उपलब्ध करुन दिली आहे. सोमवारी दिघी येथील एका खासगी कार्यक्रमाला महापौर गेले होते. कार्यक्रम आटोपून माघारी येत असताना भर रस्त्यात महापौरांची मोटार बंद पडली. दरम्यान, चऱ्होली प्रभागाचे नेतृत्व करणाऱ्या महापौरांनी आपल्या प्रभागातील खोलवर रस्ते, गतिरोधक यांमुळे मोटार नादुरुस्त होते, त्यामुळे त्रास सहन करावा लागतो, असे माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले होते. त्यामुळे महापौरांना आलिशान मोटार हवी असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
मोटार बंद पडल्याने महापौरांची दांडी
By admin | Published: June 20, 2017 7:17 AM