पिंपरी : महापालिकेच्या महापौरपदी संधी मिळण्यासाठी मूळ ओबीसी सरसावले आहेत. तर सत्ताधारी भाजपा पुन्हा कुणबी जातदाखल्यावर निवडून आलेल्या नगरसेवकाला संधी देणार असल्याची चर्चा आहे. यामुळे भोसरी विधानसभेतील नगरसेवकांसह माळी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. महापौरपदाचा वाद आता चांगलाच पेटू लागला आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपद अडीच वर्षांसाठी इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) राखीव आहे. महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपाने महापौरपदी कुणबी दाखल्यावर निवडून आलेल्या नितीन काळजे यांना संधी दिली त्यावेळीही मोठी नाराजी होती. दरम्यान, काळजे यांनी चार दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, ४ आॅगस्टला महापौर पदासाठी निवडणूक होत आहे. या वेळीही पुन्हा मूळ ओबीसीऐवजी कुणबी जातदाखल्यावर निवडून आलेल्या चिंचवड विधानसभेतील शत्रुघ्न काटे यांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे मूळ ओबीसींनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मूळ ओबीसीलाच संधी मिळावी, अशी मागणी होत आहे.शहरातील माळी समाजबांधवांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत माळी समाजाच्या नगरसेवकाला भाजपाने महापौरपदी संधी द्यावी, अशी मागणी केली आहे. शहरामध्ये तीनही विधानसभा मतदार संघात एक लाख ऐंशी हजारांहून जास्त माळी समाजाची लोकसंख्या आहे. याठिकाणी भाजपाची सत्ता येण्यास माळी समाजाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. आता माळी समाजाला महापौर पदासाठी डावलू नये, असा इशारा दिला आहे.पत्रकार परिषदेस नगरसेविका आश्विनी जाधव, स्वीनल म्हेत्रे, नम्रता लोंढे, माजी नगरसेवक अजय सायकर, सुनील लोखंडे, सागर हिंगणे, अजित बुर्डे, माजी सरपंच मंगल आल्हाट, माळी महासंघाचे आनंदा कुदळे, काळुराम गायकवाड, ईश्वर कुदळे, हनुमंत माळी, अनिल साळुंखे, सुरेश गायकवाड आदी उपस्थित होते.महापौर पद ओबीसीसाठी राखीव आहे. या पदावर मूळ ओबीसींना निवडले जावे, अशी मागणी होती. परंतु, भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी कुणबी जातदाखल्यावर निवडून आलेल्या काळजे यांची निवड केली. त्यामुळे समाजामध्ये नाराजीचे वातावरण झाले होते. काळजे यांनी राजीनामा दिला आहे. आता माळी समाजाचाच महापौर व्हावा़ - सुरेश म्हेत्रे, माजी नगरसेवक
महापौरपदाचा वाद पेटला; माळी समाज आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 5:04 AM