पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पूर्णवेळ, नियमित आणि तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध व्हावेत, यासाठी रुग्णालयामध्येच स्वतंत्र पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याच्या निर्णयास महापालिका सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्राध्यापकांची ५३ पदे भरणार आहेत.महापालिकेच्या वतीने संत तुकारामनगर येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आहे. त्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे नियोजन आहे. वायसीएममधील रुग्णसेवेचे स्टिंग आॅपरेशन लोकमतने केले होते. त्याचे पडसाद उमटून रुग्णांना लुटणाºयांची खातेनिहाय चौकशी सुरू केली आहे. रुग्णसेवेचे वाजलेले तीन तेरा यावर प्रकाश टाकला होता. याची दखल घेऊन सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी याबाबत तातडीची बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते.डॉक्टरांची अपुरी संख्या यावर चर्चा झाली होती. त्यावर रुग्णालयामध्येच स्वतंत्र पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचे प्रशासनाने सांगितले होते. त्यावर पवार यांनी महाविद्यालय सुरू झाल्यानंतर डॉक्टरांची संख्या वाढेलच, परंतु आता रुग्णांची हेळसांड होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना केल्या. त्यानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेत निर्णयास महापालिका सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्राध्यापकांची ५३ पदे भरणार आहेत. पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नीकरण, नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची परवानगी व संलग्नीकरण, राज्य सरकारकडून अध्यापक वर्गासाठीची पदमंजुरी व पात्रता प्रमाणपत्र, डीएमईआर अर्थात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचीही परवानगी मिळविली आहे. या अभ्यासक्रमाकरिता आवश्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, तसेच सहायक प्राध्यापक आणि इतर आवश्यक अधिकारी, कर्मचारी उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यानुसार या अभ्यासक्रमासाठी १० प्राध्यापक, १६ सहयोगी प्राध्यापक, तसेच २७ सहायक प्राध्यापक अशी एकूण ५३ पदे भरण्यात येणार आहेत. सहायक प्राध्यापकाला पाच वर्षापर्यंतचा अनुभव असल्यास ६० हजार रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे. तर पाच वर्षांपेक्षा जादा अनुभव असल्यास ७० हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे, तर सहयोगी प्राध्यापकांना ९० हजार रुपये आणि प्राध्यापकांना एक लाख १० हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे.
वैद्यकीय अधिकारी पदे भरणार, वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्राध्यापकांची ५३ पदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 1:36 AM