पिंपरी : एकमेकांबरोबर लढलो म्हणून मनोमिलनाला उशीर झाला, असे उत्तर आमदार आणि भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिले.मावळ आणि शिरूरची जागा शिवसेनेला गेल्यानंतर दोन्ही मतदार संघातील भाजपात अस्वस्थता होती. आमदार महेश लांडगे यांनी शिरूरवर आणि लक्ष्मण जगताप यांनी मावळवर दावा केला होता. त्यामुळे खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यापुढे भाजपा नेत्यांशी मनोमिलन करण्याचे मोठे आव्हान होते. भाजपातील वरिष्ठ नेत्यांनी मनधरणी केल्यानंतर मागील आठवड्यात आमदार महेश लांडगे यांनी आढळरावांशी जुळवून घेतले. त्यानंतरही जगताप आणि बारणे यांचे मनोमिलन झाले नव्हते. त्यामुळे जगताप काय भूमिका घेणार याकडे लक्ष होते. आज संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी शिरूरला मनोमिलन झाले, मात्र, मावळमधील मनोमिलनास उशीर का झाला? या पश्नावर जगताप म्हणाले, प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. आम्ही एकमेकांविरूद्ध लढलो होते. भोसरीत कोणी एकमेकाविरोधात लढले नव्हते. त्यामुळे वेळ लागला असावा.पवार कुटुंबियांचे आपण निकटवर्तीय मानले जातात, आपली भूमिका काय? या प्रश्नावर जगताप म्हणाले, लोकसभेची निवडणूक महायुद्ध आहे. त्यात युतीचाच उमेदवार विजयी होणार, मतांची आघाडीही मिळणार.
एकमेकाबरोबर लढलो म्हणून मनोमिलनाला उशीर : लक्ष्मण जगताप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 5:23 PM