पिंपरी : महापालिकेच्या कारभाराच्या तक्रारी, जुन्या-नव्यांचा वाद थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहोचल्याने १६ जानेवारीला विशेष बैठक बोलावली आहे. येत्या विधानसभा व लोकसभा निवडणूक आणि महापालिकेतील कारभाराची झाडाझडती घेणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्टÑवादी काँग्रेसची एकहाती सत्ता जाऊन भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आहे. भय आणि भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक कारभारासाठी नागरिकांनी भाजपाच्या हाती सूत्रे सोपविली. गेल्या आठ महिन्यांच्या कालखंडात महापालिकेतील कारभाराविषयी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी गेल्या आहेत. जुन्या आणि नव्यांचा वादही पुढे आला आहे. सत्ता येऊनही महापालिकेच्या कारभारात कोणाचेही मत घेतले जात नाही, असा आक्षेप पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांचा आहे. तसेच मेट्रो, बीआरटीला होणार विरोध, निविदांतील रिंग, तीन टक्क्यांचा आरोप याबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी पोहोचल्या आहेत.अनधिकृत बांधकामे, रिंगरोड, शास्ती हे प्रश्न सत्ताधाºयांना हाताळता आलेले नाहीत. तसेच शहरातील गुन्हेगारीही वाढली आहे. विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याबद्दल भाजपाने रान उठविले होते. मुख्यमंत्र्यांनीही विरोधकांवर टीका केली होती. त्याबाबत भाष्य केले होते. चौकशीत मात्र डोंगर पोखरून उंदीर निघाला. त्यामुळे मुख्यमंत्री तोंडघशी पडले. महापालिकेतील नेत्यांमध्ये असणारा समन्वयाचा अभाव यातून विकास कामांवर होणारा परिणाम, निविदा काढूनही प्रत्यक्षपणे सुरू न झालेली कामे अशा विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी पिंपरीतील कारभाराविषयीची माहिती विशेष सूत्रांकडून मागवून घेतली आहे. ‘गटबाजी नसल्याचा दावा’ महापालिकेतील नेते करीत असले, तरी सुप्तपणे सुरू असलेल्या गटबाजीवरही चर्चा होणार असल्याचे समजते.महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांच्या वतीने राज्यातील महापालिकांच्या आढावा बैठका सुरू आहेत. आपल्याला १५ तारीख मिळाली आहे. त्यात महापालिकेत सत्ता आल्यानंतर केलेली कामे, राबविलेले विकास प्रकल्प व विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी राज्याच्या अखत्यारित असणारे प्रश्न यावरही चर्चा होणार आहे.’’प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी सदाशिव खाडे?पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण आहे. त्यावर गेल्या १५ वर्षांपासून लोकनियुक्त समिती नाही. भारतीय जनता पक्षाच्या कालखंडात या समितीवर जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, गेल्या तीन वर्षांत ही समिती झालेली नाही. या समितीवर पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी मागणी केली आहे. मुंडे गटास संधी मिळावी, यासाठी मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली होती. या समितीच्या अध्यक्षपदी सदाशिव खाडे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा महिनाभरापासून आहे. तसेच एकूण सात सदस्य असून, त्यात प्राधिकरणातील दोन नगरसेवक व अन्य ५ सदस्य हे कार्यकर्त्यांमधून निवडले जाणार आहेत.भाजपातील जुन्या गटात अस्वस्थतामहापालिकेच्या राजकारणात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असे प्रमुख गट होते. त्यानंतर ते कार्यकर्ते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे समर्थक झाले आहेत. महापालिका कारभारात मुंडे गटासह जुन्या नेत्यांना आणि अभ्यासू कार्यकर्त्यांना सामावून घेतले जात नसल्याची तक्रार आहे. त्यांच्या सूचनांचाही विचार केला जात आहे.
कारभा-यांची झाडाझडती, विकासकामांचा आढावा, मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईत १६ जानेवारीला बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 2:47 AM