पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा (पीसीएनटीडीए) पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण ‘पीएमआरडीए’त समाविष्ट करून विलीनीकरण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या विषयी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी बैठक झाली आहे.पीएमआरडीएत समावेशाच्या हालचाली सुरू झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींनीही विरोध दर्शविला होता. हा भाग पीएमआरडीएत न जोडता महापालिकेत प्राधिकरणाचा समावेश करा, अशी मागणीही केली होती. या विषयी मुंबईत आज बैठक झाली.पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, पिंपरीचे महापौर नितीन काळजे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्ष ममता गायकवाड, पुणे स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, नगरविकास विभाग सचिव नितीन करीर, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, प्रधान सचिव असीम गुप्ता, पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त शीतल उगले, जिल्हाधिकारी सौरभ राव, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते.पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हे पीएमआरडीएमध्ये विलीन करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.’’अशी झाली चर्चाया बैठकीत पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण पीएमआरडीएत विलीन करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. प्राधिकरणाचा अध्यक्ष कोण होणार, पुढे काय करायचे याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.१) पीएमआरडीएत प्राधिकरण समाविष्ट करावे. पिंपरी-चिंचवड महापालिका ही नियोजन करणारी संस्था हवी. नगरनियोजन आणि नियोजनाचे अधिकार महापालिकेस असावेत, अशीही मागणी झाली.२) पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची मालमत्ता, कर्मचारी वर्ग, ठेवी हे सर्व पीएमआरडीएत वर्ग केले जाणार आहे.३) पुण्यातील कार्यालयही पिंपरी-चिंचवडमधील प्राधिकरणाच्या कार्यालयात स्थलांतरित होणार आहे.प्रवास प्राधिकरण ते पीएमआरडीएपर्यंतचा२००९ मध्ये तत्कालीन विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी पीएमआरडीएची निर्मिती होणार असून, प्राधिकरण त्यात समाविष्ट केले जाणार आहे, असे जाहीरपणे सांगितले होते. त्या वेळी प्राधिकरण ही पिंपरी-चिंचवड शहरातील डेव्हलपमेंट अॅथॉरिटी असून, ती समाविष्ट न करता प्राधिकरणाचा मूळ उद्देश पूर्ण झाला असून, बरखास्तीची मागणी केली होती. त्यानंतर राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) निर्मिती केली. पालकमंत्री गिरीश बापट हे त्याचे अध्यक्ष आहेत. पीएमआरडीएची स्थापना झाल्यापासून प्राधिकरणाचा समावेश पीएमआरडीएत होणार अशा चर्चा होती. या संदर्भातील अहवालही प्राधिकरणाने पाठविला होता.
प्राधिकरण होणार पीएमआरडीएत विलीन, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 2:30 AM