पिंपरी चिंचवड - लग्नाच्या पहिल्या रात्री कौमार्य चाचणी घेण्याची प्रथा कंजारभाट समाजात आहे. या प्रथेविरोधात जनजागृती करणाऱ्या समाजातीलच तरूणांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. रविवारी रात्री (21 जानेवारी) पिंपरी येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी प्रशांत इंद्रेकर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंजारभाट समाजामध्ये लग्नाच्या पहिल्या रात्री कौमार्य चाचणी घेण्याची प्रथा आहे. या प्रथेविरोधात समाजात जनजागृती करण्यासाठी विवेक तामचीकर आणि प्रशांत इंद्रेकर आणि त्यांच्या साथीदारांनी "Stop The vritual" व्हॉटस्अॅप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून जनजागृतीचे काम करण्यात येत होते.
यावरुन कंजारभाट-जात पंचायतीच्या सदस्यांमध्ये भांडण झालं व जनजागृती करणा-या तरुणांना मारहाण करण्यात आली. इंद्रेकर व त्याचे कुटुंबीय एका विवाहासाठी पिंपरीत आले होते. त्यावेळी एका टोळक्याने त्यांना घेराव घातला व मारहाण केली. याप्रकरणी पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार पाच जणांसह त्यांच्या अन्य 40 साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.