पिंपरी : राज्यात मोसमी पावसाने दडी मारल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. गुरुवारी पिंपरी-चिंचवड शहरात कमाल ३४ अंश तापमानाची नोंद झाली. ऑगस्टमध्ये शहरात निरभ्र आकाश आणि कोरड्या हवामानाची स्थिती आहे. शहरात उकाडा वाढत आहे.
पुणे जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या तुलनेत १७ टक्के पाऊस कमी झाला आहे. ऑगस्ट महिन्यात सुरुवातीचे काही दिवस पाऊस पडल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. शहरात कमाल तापमानात वाढ होत असून मागील सात दिवसांत कमाल तापमानात ५ अंशांनी वाढ झाली आहे. गुरुवारी शहरात किमान २१ आणि कमाल ३४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. शहरात दुपारी उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारा लागत असून अनेक ठिकाणी पारा ३४ अंशांवर गेला आहे.
तापमान अंशामध्ये
चिंचवड - ३४
पुणे - ३४
पाषाण - ३३
लोहगाव - ३५