अामच्यामुळे प्राधिकरणाचे पीएमअारडीएमध्ये विलिनीकरण थांबले : काॅंग्रेसचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 03:39 PM2018-09-02T15:39:16+5:302018-09-02T15:42:55+5:30
काॅंग्रेसच्या विराेधामुळे नवनगर विकास प्राधिकरणाचे पीएमअारडीएमध्ये विलिनीकरण थांबले असल्याचा दावा काॅंग्रेसने केला अाहे.
पिंपरी : नवनगर विकास प्राधिकरण, पीएमआरडीअंतर्गत (पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण) कामकाज करतील, अर्थातच प्राधिकरणाचे पीएमआरडीएमध्ये विलिनीकरण करायचे. असे धोरण पुढे आणण्याचा भाजपाने घाट घातला. मात्र शहरातील निधी इतरत्र न जाता, तो शहर विकासाच्या कामी आला पाहिजे. अशी भूिमका घेऊन काँग्रेसने विरोध केला. त्याची परिणीती नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेने दिसून आली. भाजपाकडून प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने प्राधिकरण पीएमआरडीएमध्ये विलिन होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हे काँग्रेसच्या विरोधामुळेच घडले. असा दावा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे पुढे म्हणाले, शहरातील महत्वाच्या संस्थांचा योग्य समन्वय हवा, यात दुमत नाही. परंतू त्या संस्था एकाच छताखाली नेल्याने शहर विकासाला स्वतंत्रपणे निधी उपलब्ध होणार नाही. या शहरात मिळणारे उत्पन्न अन्य ठिकाणच्या विकास कामांवर खर्च होईल. येथील शहरवासियांसाठी ते अन्यायकारक ठरेल. त्यामुळे भाजपाने प्राधिकरण पीएमआरडीएत विलिनीकरणाचा घाट घालू नये, या साठी काँग्रेसने कडाडून विरोध केला होता. अशा प्रकारचे विलिनीकरण म्हणजे शहरातील मालमत्तेवर टाकलेला एक प्रकारचा दरोडा ठरेल. अशा शब्दात काँग्रेसने त्यावर टिका केली होती. प्राधिकरणाला तब्बल १४ वर्षांनी अध्यक्ष मिळाला आहे. भाजपाने अध्यक्षपदावर सदाशिव खाडे यांना संधी दिली. त्यांच्याकडून चांगले काम होईल, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही.
शिवसेना आणि भाजपा एकत्रितपणे निवडणुकीचा खेळ खेळत आहेत. एकत्रित बसून धोरण ठरवतात. एकमेकांच्या विरोधात आहेत असे भासवितात. नागरिकांची दिशाभूल करण्याचे काम हे दोन्ही पक्ष करीत आहेत. पदाचा राजीनामा या शब्दाचे महत्वच त्यांनी कमी केले आहे. राजीनामा या शब्दाला काही अर्थ उरला नाही. सोईस्कर असा या शब्दाचा अर्थ त्यांच्याकडून काढला जातो. हे नागरिकांच्या लक्षात येऊ लागले आहे.