आयुक्तांच्या घरच्या देखाव्यातून पर्यावरण रक्षण व कलासंवर्धनाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 07:03 PM2018-09-14T19:03:01+5:302018-09-14T19:09:18+5:30
शहरातील विविध मान्यवरांनीही बाप्पाची प्रतिष्ठापना करताना आगळेवेगळे संदेश दिले आहे. महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे मोरवाडी-केएसबी चौक रस्त्यावरील बंगल्यात वास्तव्यास आहेत. त्यांनीही गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे.
विश्वास मोरे
पिंपरी : गणेशोत्सवात घरगुती गणपतीस आकर्षक सजावट केली जाते. पिंपरी महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बाप्पांना आकर्षक सजावट केली आहे. कला आणि विद्येची देवता असलेल्या बाप्पांसमोर विविध कला साहित्य संस्कृतीचे दर्शन घडविणारी आकर्षक सजावट केली आहे. अभिजात शास्त्रीय संगीतातील संवादिनी अर्थात हार्मोनियम, तबला, तंबोरा आणि विविध पुस्तकांचा वापर केला आहे. परंपरा जपण्याबरोबरच पर्यावरण, कला संवर्धनाचा संदेश दिला आहे.
कला अधिपती गणरायाचे आगमन झाले आहे. शहर गणेशमय झाले आहे. नेत्रदीपक सजावटी आणि रोषणाई लक्ष वेधून घेत आहे. शहरातील विविध मान्यवरांनीही बाप्पाची प्रतिष्ठापना करताना आगळेवेगळे संदेश दिले आहे. महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे मोरवाडी-केएसबी चौक रस्त्यावरील बंगल्यात वास्तव्यास आहेत. त्यांनीही गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. हर्डीकर आणि आदिती हर्डीकर हे दाम्पत्य हे कलाप्रेमी आहे. जेथे नियुक्तीवर असतील त्या ठिकाणी आयुक्त हे गणरायाची प्रतिष्ठापना करतात. पाच दिवस मनाभावे सेवा केली जाते. तसेच दरवर्षी बाप्पांसमोर वेगवेगळी आकर्षक अशी आरास केली जाते. यंदा गणपतीसमोर पर्यावरणपूरक कलांसंस्कृतीचे दर्शन घडविणारी सजावट केली आहे.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, गणपती ही कलेची देवता आहे. त्यामुळे कलांची आरास तयार केली आहे. दरवर्षी आमच्या घरी गणपती बसविला जातो. यंदा पर्यावरणपूरक आरास तयार केली आहे.सर्वसाधारणपणे गणपतीच्या आरास करण्यासाठी थर्मोकॉल वापरले जाते. मात्र, आरास करण्यासाठी १९९२ पासून थर्मोकॉलचा वापर बंद केला आहे. तर १९९१ पासून गणपतीचे विर्सजन करण्याचे बंद केले आहे. देव्हा-यातीलच मूर्ती प्रतिष्ठापित केली जाते. घरामध्येच पाण्यात विसर्जित केले जाते आणि पुन्हा ती मूर्ती देव्हा-यात ठेवली जाते. गणपतीनिमित्त दरवर्षी वेगवेगळी थिम घेऊन आरास केली जाते. यंदा कलांचा अधिपती ही संकल्पना घेतली आहे. नागरिकांनीही पर्यावरणपूरक असा उत्सव साजरा करण्यावर भर द्यायला हवा.
..................
कलाअधिपती बाप्पांना भेट
गणराय हे कलांचे अधिपती. त्यामुळे आयुक्तांनी कलांचा अधिपती ही संकल्पना घेतली आहे. सजावटीत विविध कला आणि त्यांच्यासंबंधितील साहित्य मांडले आहे. भारतीय अभिजात संगीताची वाद्ये, लेखन साहित्य, पॉटरी, पेटिंग, फोटोग्राफी, ग्लासवर्क, घुंगरु, सावंतवाडीतील लाकडी खेळणी, पुस्तके, कवितासंग्रह, कागद असे बरेच कला साहित्य ठेवण्यात आले आहे.