चिंचवड : सात दिवसांच्या गणरायाला बाप्पा मोरयाचा जयघोष करत चिंचवडकरांनी गुरुवारी निरोप दिला. १९ सार्वजनिक गणेश मंडळे व हजारो घरगुती गणेशमूर्तींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन झाले.थेरगावजवळील विसर्जन घाटावर व मोरया गोसावी समाधी मंदिर परिसरात अनेक गणेश भक्तांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. विसर्जन घाटावर सकाळपासूनच घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन सुरू होते. विसर्जन मार्गावर व घाटावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विसर्जन घाटावर पवना नदी पात्रात पाणी जास्त असल्याने पोलीस व स्वयंसेवकांनी खबरदारीच्या उपाययोजना केल्या होत्या. महापालिकेच्या वतीने जय्यत तयारी केली होती.सायंकाळी विसर्जनासाठी गर्दी वाढत गेली. विसर्जनासाठी पाण्याचा हौद उपलब्ध असल्याने अनेकांनी या ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन केले. निर्माल्य दानासाठी पालिका प्रशासन व सेवाभावी संस्थानी भाविकांना नदी पात्रात निर्माल्य न टाकण्याचे आवाहन केले. चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी विसर्जन घाटावर व परिसरात पोलीस यंत्रणा सज्ज ठेवली होती. चिंचवड वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी बंदोबस्त देत होते.तसेच निगडी, प्राधिकरणातही गणेश तलावावरही घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यात आले. काही शाळांच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम पाहिले. निर्माल्यएकत्र केले.
चिंचवडमध्ये गणरायाला निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 6:13 AM