पिंपरी : पूर्ववैमनस्यातून दुचाकीवरून जाणाऱ्या एकावर कोयत्याने वार करत निर्घुन खून केला. त्यानंतर हल्ला करून रिक्षामधून आरोपी फरार झाले. ही घटना १ जुलैला सायंकाळी सात वाजता म्हाळुंगे येथे घडली. खून केल्यानंतर फरार झालेल्या संशयित आरोपींना म्हाळुंगे पोलिसांनी ४८ तासांत अटक केली.
विशाल पांडुरंग तुळवे (वय ३७, रा. खालुंब्रे), मयुर अशोक पवार (३०, तळेगाव दाभाडे), रणजित बाळू ओव्हाळ (२२, खालुंब्रे), प्रथम सुरेश दिवे (२१, म्हाळुंगे), विकास पांडुरंग तुळवे, चंद्रकांत भिमराव तुळवे व सनी रामदास तुळवे (सर्व रा. खालुब्रे) यांना पोलिसांनीअटक केली आहे. गणेश अनिल उर्फ आण्णा तुळवे (वय ३०) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जुलैला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मयत गणेश तुळवे हे त्यांचा भाचा प्रणय प्रदिप तुळवे यांच्या सोबत दुचाकीवरून म्हाळुंगे वरून खालुंब्रेकडे जात होते. एच पी चौकाजवळ दबा धरून बसलेल्या विशाल तुळवे व त्याच्या साथीदारांनी गणेश यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या डोक्यावर पाठीमागील बाजूस कोयत्याने वार करत त्यांचा निर्घुण खून केला. त्यांना सोडवण्यासाठी मध्ये येणारा त्यांचा भाचा प्रणय याच्यावर देखील कोयत्याने वार केले. त्यानंतर सर्व संशयित आरोपी रिक्षामधून फरार झाले.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त शिवाजी पवार, चाकण विभागाचे सहायक पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांनी गुन्ह्याच्या तपासासंदर्भात सूचना केल्या. त्यानुसार, म्हाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते यांनी तीन पथके रवाना केली. खून करून फरार झालेले संशयित लोणावळा मार्गे मुंबई येथे गेल्याबाबत तांत्रिक तपासात उघड झाले होते. मात्र, पोलिस तेथे पोहचेपर्यंत संशयित तेथून फरार झाले. त्यानंतर ते मावळ येथील जांबवडे गावामध्ये एका घरात लपून बसले असल्याचे पोलिस हवालदार तानाजी गाडे, विठ्ठल वडेकर, किशोर सांगळे, संतोष काळे यांना माहित झाले. त्याआधारे नितीन गिते यांनी शोध पथकाच्या मदतीने सहायक पोलिस निरीक्षक कल्याण घाडगे व गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना पाठवून संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या.