तळेगाव स्टेशन : एमआयडीसी अंतर्गत ठिकठिकाणी झालेली छोटी-मोठी अतिक्रमणे व विविध कंपन्यांसमोर, तसेच रस्त्याच्या कडेला नियम मोडून उभी केलेली वाहने यांमुळे जुना मुंबई-पुणे मार्ग ते नवलाख उंब्रे हा तळेगाव एमआयडीसी अंतर्गत येणारा चौपदरी रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. तेथे रोज छोटे-मोठे अपघात होत आहेत.एमआयडीसी अधिकारी व कर्मचारी यांच्या आशीर्वादाने एमआयडीसीत रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या अतिक्रमणातील हॉटेल, टपऱ्यांसमोर आणि चौक रस्त्यांवर प्रवाशी व मालवाहतूक करणारी वाहने उभी करून चालक निर्धास्त गप्पा मारत बसतात. अंतर्गत वाहनतळाची वा पुरेशी सोय न केलेल्या कंपन्यांसमोर ट्रेलर व अवजड वाहने रस्त्यावर तासन्तास उभी असतात. त्यामुळे वाहनचालक आणि दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून चालावे लागते. कंपनीच्या बसही चालक जोरात बस हाकतात. वाहने कंपन्यांच्या प्रवेशद्वाराजवळून अचानक आत किंवा बाहेर वळतात. आंबी गावातून बाहेर पडणारे वाहनचालक कसलाही अंदाज न घेता अतिवेगात एमआयडीसी सर्कलकडे येऊन वळसा घालतात.मंगरूळ फाट्यावर, आंबीतून तसेच मंगरूळकडून येणारे डंपर अचानक समोर येऊन मुख्य रस्त्यावर वळतात. तेथील उतारावर टीसीआय गोदामासमोर अनेक वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुक्तपणे उभी केली जातात. इंद्रायणी पुलाजवळील एचपी पंपाशेजारी असलेल्या अशोक लेलँड कंपनीच्या गोदामासमोर अनेक बस व चॅसी रस्त्यावरच खाली उतरवून उभ्या केल्या जातात. डी.वाय.पाटील कॉलेजवर अवैधरीत्या वाहतूक करणारे सहा आसनी मॅजिक चालक बेशिस्तपणे वाहन चालवितात. या रस्त्यावर रोज अपघात होतात. अनेक निरपराध लोकांचे बळी गेले आहेत.पोलीस एमआयडीसी परिसरात अपघात किंवा गुन्हा घडल्यानंतरच फिरकतात. अतिक्रमित जागांवरील हॉटेलवर कारवाई होईल, असे वाटत नाही. टपऱ्यांसमोर वाहने उभी करण्यास बंदी नक्कीच घालता येईल. तळेगाव, वडगाव पोलीस ठाण्यांचे गस्ती वाहन रोज आळीपाळीने फिरविल्यास बेशिस्त वाहनचालकांना जरब बसेल. कंपन्यांना गेटसमोर वाहने उभी करू न देण्याची तंबी देऊन प्रसंगी दंडात्मक कारवाई केल्यास नक्कीच फरक पडेल. अपघात टाळण्यासाठी पोलीस व एमआयडीसीने संयुक्त मोहीम राबवून, शिस्त लावण्याची गरज व्यक्त होत आहे.(वार्ताहर)
एमआयडीसी रस्ता बनला मृत्यूचा सापळा
By admin | Published: June 29, 2015 6:34 AM