मावळात गेल्या काही वर्षांपासून बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढली असून, तालुक्यातील प्रमुख नद्यांच्या पाण्यावर या कंपन्यांचा धंदा सध्या तेजीत सुरू आहे. नदीतील बेकायदा व बेसुमार पाणी उपस्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गोची होऊ लागली असून, अनेकांची पिके पाणी न मिळाल्याने जळून नुकसान होत आहे.मावळासह राज्यात विनापरवाना सुरू असलेल्या पाणी प्लांटमुळे बाटलीबंद पाण्याचा काळाबाजार जोमाने वाढला आहे. मावळ तालुका हा पाण्याच्या बाबतीत समृद्ध असला तरी नदीच्या आजूबाजूला शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फटका बसू लागला आहे. इंद्रायणी नदीच्या पाण्यावर अनेक शहरे व गावे आपली तहान भागवत असताना याच पाण्यावर कंपन्यांनी डल्ला मारल्याने अनेक ठिकाणच्या पाणीपुरवठा योजना विस्कळीत होऊ लागल्या आहेत.गेल्या काही वर्षांमध्ये अनेक पाणी कंपन्यांनी आपले बस्तान बसवले असून, मावळातील नद्यांच्या पाण्यावर त्यांचा व्यवसाय तेजीत सुरू आहे. पण, या कंपन्या परवाना धारक आहेत का?, कंपनीतून बाजारात विक्रीसाठी येणारे बाटलीबंद पाणी आवश्यक प्रक्रिया केलेले आहे का?, कंपनीची संबंधित ग्रामपंचायतमध्ये नोंद आहे का?, राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे कंपनीवर नियंत्रण आहे का?, पाणी उपस्याची परवानगी घेतली आहे का?, घेतली असल्यास परवानगी इतकेच पाणी उचलले जाते का? आदी प्रश्न जागरूक नागरिक विचारू लागले आहेत. त्याचे उत्तर मिळाले पाहिजे.बाटलीबंद पाण्याचा प्रकल्प सुरू करण्यासाठी आयएसआय परवाना मिळाल्यानंतर पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मायक्रोबायोलॉजी व केमिकल लॅब असणे गरजेचे आहे. या प्रयोग शाळांमध्ये पाण्याची गुणवत्ता चाचणी करण्यासाठी तज्ज्ञ असावे लागतात. शिवाय एफडीएचा परवान्यासह प्रदूषण नियंत्रणाचा परवाना असणे आवश्यक असते. या सर्वातून पळवाट काढून पाण्याच्या कंपन्या बंद जार आणि बाटलीमधून पाण्याचा बेकायदा व्यवसाय करत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. कोणत्याच प्रकारच्या प्रक्रिया न केलेले पाणी बाटलीबंद करून विकण्याचा सपाटा या कंपन्यांनी सुरू केला आहे.काही दिवसांपूर्वीच कामशेत शहराजवळील मुंढावरे गावाच्या हद्दीत असलेल्या बिसलरी इंटरनॅशनल कंपनीकडून बाजूनेच वाहणाऱ्या इंद्रायणी नदीतून बेकायदा पाणीउपसा होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी तसेच मावळचे तहसीलदार जोगेंद्र कट्यारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. मुंढावरे गावाच्या हद्दीतील इंद्रायणी नदीला लागून सुमारे शंभर फूट अंतरावर कंपनी व कंपनीचा बंगला आहे. पण, या दोन्हीची ग्रामपंचायतीत नोंदणी नाही. कंपनी व बंगला शेती झोन क्षेत्रात बांधला आहे. या भागात सन १९९४ मध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधला आहे. कंपनीच्या व्यवस्थापकांनी या बंधाऱ्यात स्वत:च्या फायद्यासाठी काही बदल केले असल्याने आधीसारखा पाणीसाठा होत नाही. याशिवाय कंपनीने नदीच्या बाजूला एक विहीर बांधली आहे. या सर्वांमुळे शेतकऱ्यांना पाण्याचा अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्याच प्रमाणे कंपनीने नदीपात्रात बांधलेल्या बंधाऱ्यामुळे पाण्याचा प्रवाह बदलला असून पावसाळ्याच्या दिवसांत आजूबाजूच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जाऊन शेतीचे नुकसान होत आहे, असे निवेदनात म्हटले होते.सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने तहान भागवण्यासाठी बाटलीबंद थंड पाण्याची मागणी आहे. मात्र, असे पाणी विकत घेताना नागरिकांनी विचार करणे गरजेचे आहे.
मिनरलचा गोरख धंदा बळिराजाच्या मुळावर
By admin | Published: April 25, 2017 4:05 AM